युवा व्हायोलिनवादक राजस उपाध्ये यांचे व्हायोलिन वादन, प्रसिद्ध गायक धनंजय हेगडे यांचे बहारदार गायन तर जगविख्यात तबलावादक पद्मश्री पंडित विजय घाटे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘मेलोडिक रिदम’ या कार्यक्रमाने रसिक मंत्रमुग्ध झाले. गायन-वादन-नृत्य य
.
अभिनव गंधर्व पंडित रघुनाथ खंडाळकर संगीत कला अकादमी, पुणे यांच्या वतीने पुणे विद्यार्थी गृहाच्या कुलगुरू दादासाहेब केतकर सभागृहात ‘ज्ञानदेव संगीत महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरुवात अकादमीतील विद्यार्थिनींनी सादर केलेल्या ‘कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर’ या पंडित रघुनाथ खंडाळकर यांनी संगीतबद्ध केलेल्या अभंगाने झाली. महोत्सवाचे उद्घाटन प्रसिद्ध उद्योजक विलास जावडेकर, दादा तरंगे, अभिनव गंधर्व पंडित रघुनाथ खंडाळकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाली.
युवा व्हायोलिन वादक राजस उपाध्ये यांनी राग झिंझोटीमधील आलाप, झपताल, तीनताल आणि मध्यलयतील बंदिश सादरीकरणाने केली. त्यानंतर उपाध्ये यांनी राग किरवाणी सादर केला. कधी सुरांची आराधना करत तर कधी सुरांशी लडिवाळपणे संवाद साधत उमटलेले व्हायोलीनचे सूर रसिकांच्या मनाचा ठाव घेऊन गेले. अनुराग अलुरकर (तबला) यांनी दमदार साथ केली. पंडित रघुनाथ खंडाळकर यांचे गुरू मधुसूदन नारायण कुलकर्णी यांच्या नावे दिल्या जाणाऱ्या युवा वादक पुरस्काराने राजस उपाध्ये यांना सन्मानित करण्यात आले.
किराणा व ग्वाल्हेर घराण्याची तालीम मिळालेले सुप्रसिद्ध गायक धनंजय हेगडे यांनी आपल्या मैफलीची सुरुवात राग भूपालीतील विलंबित तीन तालातील ‘अब मानले’ या बंदिशीने केली. द्रुत लयीत ‘जाऊ तोरे चरण’ ही भातखंडेबुवांनी रचलेली बंदिश प्रभावीपणे सादर करत द्रुत एकतालात रामश्रय झा यांची ‘मान लिजीए सुंदरवा’ ही रचना सादर केली. हेगडे यांनी मैफलीची सांगता केदार रागातील गुरू पंडित विनायक तोरवी यांच्या ‘चलो चलो हटो सैंय्या मोरे’ या बंदिशीच्या सादरीकरणाने केली. हेगडे यांचा खुला आवाज, स्पष्टोच्चार, दमदार ताना आणि सुश्राव्य गायनाने रसिक प्रभावीत झाले. अमेय बिचू (संवादिनी), आशय कुलकर्णी (तबला) यांची सुरेल साथसंगत होती.
पद्मश्री पंडित विजय घाटे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘मेलोडिक रिदम’ या गायन-वादन आणि नृत्य कलांचा अनोखा संगम साधणाऱ्या अनोख्या कार्यक्रमाला रसिकांसह उपस्थित कलाकारांनी मनमुराद दाद देत आनंद घेतला. सुरुवातीस सुरंजन खंडाळकर यांनी वडिल, गुरू रघुनाथ खंडाळकर यांनी रचलेली ‘राधे देवो बांसुरी’ ही भक्तीरसपूर्ण रचना सादर केली. त्यावर कथक नृत्यांगना शितल कोलवालकर यांनी नृत्याविष्कार सादर केला. पंडित विजय घाटे यांनी सादर केलेल्या उत्स्फूर्त एकल तबलावादनाने रसिकांना मोहित केले.