आवर्तन अचानक बंद झाल्याने शेतकऱ्यांचेआंदोलन

0

देवळाली प्रवरा / प्रतिनिधी
निळवंडे प्रकल्पाच्या उजव्या कालव्यावरील पाण्याचे आवर्तन अचानक बंद झाल्याने राहुरी तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला.
याविरोधात आज (३ मे) २०० ते ३०० शेतकऱ्यांनी संगमनेर येथील गोदावरी पाटबंधारे प्रकल्पाच्या उपविभागीय कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले.
भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष अमोल भनगडे, किरण कोळसे, बबन कोळसे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी प्रशासनाला निवेदन देत तात्काळ
पाणीपुरवठा सुरू करण्याची मागणी केली. शाखा अभियंता प्रदीप हापसे यांनी आवर्तन पूर्ववत करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

२२ एप्रिलपासून सुरू झालेले हे आवर्तन १ मे रोजी संगमनेर तालुक्यातील शेतकऱ्यांनी अनधिकृतपणे पाइप टाकल्याने खंडित झाले. यामुळे निंभेरे, तुळापूर, वडनेर,’ कानडगाव, कनगर, तांभेरे, चिंचविहीरे, गणेगाव, गुहा या गावांतील शेतकऱ्यांचे पाणी बंद झाले. यामुळे शेतकऱ्यांनी कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू शकतो, असा इशारा दिला. भनगडे म्हणाले, “संगमनेरला पाणी देण्यास विरोध नाही, पण आमच्या हक्काचे पाणी आम्हाला मिळालेच पाहिजे.”

आंदोलनात विकास कोबरणे, बबनराव कोळसे, बाबासाहेब गाडे, महंमद भाई इनामदार, सर्जेराव खेमनर, डॉ. बापूसाहेब मुसमाडे, भागिनाथ बेलकर, नानासाहेब गागरे यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले. शेतकऱ्यांनी पाणी न मिळाल्यास मोठे जनआंदोलन उभारण्याचा आणि त्याची जबाबदारी प्रशासनाची राहील, असा इशारा दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here