देशात जातनिहाय जनगणना करण्याचा केंद्र सरकारने घेतलेला निर्णय हा बहुजन समाज पक्षाच्या विचारधारेचा, मागणीचा आणि लढ्याचा विजय आहे, असे प्रतिपादन पक्षाचे प्रदेश महासचिव आणि पश्चिम महाराष्ट्र झोन मुख्य प्रभारी डॉ.हुलगेश चलवादी यांनी रविवारी (ता.४) व्यक्त
.
काँग्रेस-भाजपच्या बहुजन विरोधी धोरणामुळे हा समाज अजूनही शोषित-पीडित-वंचित असल्याची खंत यनिमित्ताने त्यांनी व्यक्त केली. ‘जिसकी जितनी संख्या भारी, उसकी उतनी भागीदारी’ ही घोषणा सर्वप्रथम देणारे पक्षाचे संस्थापक मान्यवर कांशीराम जी यांच्या विचारांवर चालणाऱ्या बसपच्या संघर्षामुळेच देशाच्या स्वातंत्र्यानंतर पाहिलांदाच जातनिहाय जनगणना होईल, असे डॉ.चलवादी म्हणाले.
भाजप-काँग्रेस मध्ये जातनिहाय जनगणनेच्या निर्णयाचे श्रेय घेण्याची स्पर्धा सुरु आहे. मुळात या मागणीचा उगमच ‘बसपा’ आहे. काँग्रेस-भाजप आणि इतर पक्षांची बहुजनांबद्दलचे धोरण पवित्र असते तर,ओबीसी समाज देशाच्या विकासात मोठा भागीदार बनला असता.भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे ‘आत्मसन्मान आणि स्वाभिमान’चे मिशन त्यामुळे पूर्णत्वास आले असते,अशी भूमिका मायावती यांची असल्याचे डॉ.चलवादी म्हणाले.
डॉ.बाबासाहेब आणि बसपाच्या सातत्यपूर्ण संघर्षामुळे आज ओबीसी समाज बराच जागरूक झाला आहे.त्यामुळे दलितांप्रमाणे ओबीसींच्या मतांवर डोळा असलेल्या या पक्षांना ते बहुजन हितकारक असल्याचे भासवावे लागतेय. बसपातच दलित, आदिवासी,ओबीसी तसेच सर्व समाजाचे हित समाविष्ट आहे.१९३१ आणि स्वातंत्र्यानंतर देशात पहिल्यांदा जातनिहाय जनगणना घेण्याचा केंद्राच्या निर्णयाचे श्रेय लाटतांना,दलित-ओबीसी समाजातील कोट्यवधी नागरिकांना आरक्षणासह त्यांच्या घटनात्मक हक्कापासून वंचित ठेवण्याचा ‘काळा अध्याय’ नावावर करणाऱ्या आणि त्यामुळेच सत्तेतून बेदखल झालेल्या काँग्रेसला विसर पडला आहे.परंतु सत्तेपासून दूर झाल्यानंतर काँग्रेसच्या नेतृत्वामध्ये विशेषतः दलित व ओबीसी समाजाबाबत नव्याने निर्माण झालेलं विश्वासार्ह वाटत नाही. ते फक्त त्यांच्या मतांसाठी केलेलं एक स्वार्थी आणि फसव्या राजकारणाच स्वरूप आहे. आरक्षण निष्क्रिय करून ते अखेरीस संपवण्याचा त्यांचा अशुद्ध हेतू कोण विसरू शकतो? असा सवाल डॉ.चलवादी यांनी उपस्थित केला.
घटनाकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न सन्मानाने सन्मानित करण्याचा विषय असो वा कलम ३४० अंतर्गत ओबीसींना आरक्षण देण्याचा मुद्दा असो- या सर्व मुद्द्यावर काँग्रेस व भाजपचे वर्तन जातीयवादी आणि द्वेषपूर्ण राहिलं आहे.परंतु, यांची मतांसाठीचे राजकारण मात्र निराळ आहे.त्यामुळे नागरिकांनी त्यांच्या राजकारणापासून सावध राहण्याची आवश्यकता आहे,असे आवाहन डॉ.चलवादी यांनी केले.