.
देवळाली गावात घरगुती गॅस सिलिंडरमधील गॅस वाहनांमध्ये भरणा करणारा अड्डा गुन्हा शोध पथकाने उद्धवस्त केला आहे. पेालिसांनी घटनास्थळावरून ६३ घरगुती गॅस सिलिंडर, ३ वजन-काटे, ४ यंत्र असा सुमारे ३ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणात अड्डा चालविणाऱ्या शिवा लोणारे, शाकीर मोहम्मद शहा, नवाज अहमद शहा या ३ संशयितानंा भारत गॅस कंपनीच्या घरगुती सिलिंडरमधील गॅस मशीनद्वारे खाजगी वाहनांमध्ये भरत असताना ताब्यात घेतले.
नाशिकरोड परिसरात विनापरवाना बेकायदेशिररित्या गॅस सिलिंडरमधून मशिनद्वारे ज्वलनशिल स्फोटक पदार्थ (गॅस) खाजगी वाहनांमध्ये भरण्याचा अवैध व्यवसाय सुरू होता. या व्यवसायाला स्थानिक पोलिसांचे पाठबळ असल्याचा आरोप केला जात होता. काही नागरिकांनी पेालिस आयुक्तांच्या दरबारात याची तक्रारही केली होती. गुन्हा शोध पथकातील सहायक उपनिरीक्षक विलास गांगुर्डे यांना मिळालेल्या माहितीनुसार पथकाने देवळाली गाव येथील पाटील गॅरेजच्या पाठीमागे भारती मठाजवळ, पत्राचे शेड येथे छापा टाकला. तेथे घरगुती वापराचे ६३ गॅस सिलिंडर, ३ वजन-काटे आणि सिलिंडरमधून वाहनांमध्ये गॅस भरणारे ३ मशीन आढळून आले. ही कारवाई होताच वाहनधारकांनीही पळ काढला. सहाय्यक निरीक्षक हेमंत तोडकर, यशवंत बेंडकोळी यांच्या पथकाने ही कारवाई केली. अड्डा चालविणाऱ्या संशयित तिघांवर जीवनावश्यक वस्तू प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली.