[ad_1]
.
मातीपासून निर्मित भांड्यामध्ये जे चित्र काढले जाते ते कधीच मिटत नसते, अगदी त्याचप्रमाणे बाल्यावस्थेत व गर्भात जे संस्कार केले जातात ते मिटत नाहीत. म्हणून बाल्यावस्थेपासून आपल्या मुलांना सुयोग्य व आदर्श संस्कार देण्याची गरज असल्याचा हितोपदेश मोहन महाराज यांनी केला.
बालकांमध्ये नैतिक गुण बिंबवून त्यांच्यात आध्यात्मिक, पारंपारिक आणि नैतिक मूल्ये व संस्कार रुजवण्यासाठी डाबकी रोड येथील राजेश्वर कॉन्व्हेंटच्या स्वामी विवेकानंद संस्कार केंद्रात सुरू असणाऱ्या सतरा दिवसीय बालसंस्कार शिबिरास बालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. यात मुख्य शिक्षक मोहन महाराज गोंडचवर बालकांना मार्गदर्शन करत होते. संजय महाराज पाचपोर, तुकाराम महाराज सखारामपूरकर, ज्ञानेश्वर महाराज वाघ, गोपाळ महाराज, मोतीराम महाराज आदींच्या मार्गदर्शनात आयोजित या शिबिरात ते पुढे म्हणाले, उत्तम संस्काराच्या संदर्भात अभिमन्यू, भक्त प्रल्हाद, ध्रुव आदींचे उदाहरण लौकिक आहे. आपल्या बालकांना सदाचार, सहचरण, धर्माचरण देणारे आई- वडील हे आदर्श माता पिता असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. ते म्हणाले, संस्कार हे तीन प्रकारचे असतात. ते म्हणजे दोषमार्जन, अतिशयाधान व हिनांगपूर्ती होत. ज्या प्रमाणे धान्यातून माती, खडा,भुसा काढणे म्हणजे दोषमार्जन होय, दळणे, अग्नीच्या साहाय्याने शिजवणे म्हणजे अतिशयाधान होय तर मीठ व तूप टाकणे म्हणजे हिनांगपूर्ती प्रकिया होय. हीच प्रक्रिया संस्काराच्या संदर्भात होत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
शिबिराचे व्यवस्थापन गजानन अरबट, अरविंद शेंडे, नाना चोरे, अरविंद भिरड, रमेश पवार, संदिप मुठ्ठे, प्रशांत पिसे, डॉ. सुभाष लव्हाळे आदी करत आहेत. दरम्यान नुकत्याच झालेल्या सत्रात बालकांनी हरिपाठात पावल्या सादर करत भक्तिभाव निर्माण केला. १८ मेपर्यंत आयोजित या बाल संस्कार शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन मोहन महाराज यांनी केले.
[ad_2]