[ad_1]
आगामी पावसाळ्यात नैसर्गिक आपत्तीचा प्रभावी सामना करण्यासाठी प्रशासनातील सर्व विभागांनी योग्य समन्वय ठेवावा तसेच तालुकास्तरावर २४ तास नियंत्रण कक्ष सुरु ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी बुधवारी ता. १४ यंत्रणांना दिले आहे.
.
मान्सूनपूर्व तयारीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी गुप्ता यांनी दूरदृष्यप्रणालीव्दारे यंत्रणेच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी उपविभागीय अधिकारी प्रतिक्षा भुते, विकास माने, तहसीलदार शारदा दळवी, श्रीकांत भुजबळ, जीवककुमार कांबळे, हरिष गाडे, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.चक्रधर मुंगल, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.नितीन तडस, महावितरणचे अधीक्षक अभियंता राजेसिंग चव्हाण, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी रोहित कंजे यांच्यासह अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
यावेळी जिल्हाधिकारी गुप्ता यांनी जलद प्रतिसाद पथक, आपत्कालीन संपर्क यंत्रणा, वैद्यकीय सुविधा, पूरप्रवण क्षेत्रातील उपाययोजना आणि जनजागृती मोहिमांवर भर देण्याच्या सूचना दिल्या. जिल्ह्यातील पैनगंगा, पूर्णा, कयाधू आणि इतर नद्यांमुळे काही गावांना पूराचा धोका असल्याने संबंधित यंत्रणांनी दक्ष रहावे. पूरप्रवण ७० गावांमध्ये आवश्यक साहित्याची तपासणी करून ठेवावी. पूर परिस्थितीत पुरात अडकलेल्या लोकांना वाचविण्यासाठी बचाव पथके तयार करुन त्यांना प्रशिक्षण द्यावे. तालुकास्तरावर 24 तास नियंत्रण कक्ष कार्यरत ठेवून कर्मचाऱ्यांचे मोबाईल क्रमांक अद्ययावत करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
आरोग्य विभागाने आरोग्य पथकांची नियुक्ती, प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार, मुबलक औषधे, रक्तसाठा, ब्लिचिंग पावडरची साठवणूक यावर भर द्यावा. पालिकांनी शहरातील नाल्यांची स्वच्छता, धोकादायक इमारतींची तपासणी, स्थलांतराची पर्यायी व्यवस्था, सुरक्षित स्थळांची निवड करावी. महावितरण, शिक्षण, पशुसंवर्धन व कृषी विभागांनीही आवश्यक उपाययोजना राबवाव्यात. पाटबंधारे विभागाने धरणनिहाय समन्वय अधिकारी नेमण्याच्या सूचना जिल्हाधिकारी गुप्ता यांनी केल्या.
तालुकास्तरावर उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी यांनी पूर्वतयारी पूर्ण करावी. वाहन व्यवस्था सुरळीत ठेवावी. नागरिकांनी दामिनी ॲप डाऊनलोड करून विजेपासून बचाव करावा. असे आवाहन त्यांनी केले.
[ad_2]