[ad_1]
रोहित शर्मा आणि विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेत संपूर्ण क्रिकेटविश्वाला धक्का दिला आहे. करिअरच्या या टप्प्यावर दोघेही निवृत्ती घेतील असा अंदाज कोणीही लावला नव्हता. कसोटी क्रिकेटमध्ये दोघेही संघर्ष करत होते. बॉर्डर गावसकर ट्रॉफीमध्ये दोघेही अपेक्षित कामगिरी करु न शकल्याने त्यांच्यावर टीकाही झाली होती. इंग्लड दौऱ्यासह भारताच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पिअपनशिप चक्र सुरु होत असून, यानिमित्ताने रोहित आणि विराटने निवृत्ती घेत तरुण खेळाडूंसाठी मार्ग मोकळा केला आहे. दरम्यान नेहमी आपली मतं परखडपणे मांडणारे भारतीय क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटर युवराज सिंगचे वडील योगराज सिंग (Yograj Singh) यांनी रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहलीमध्ये (Virat Kohli) अद्याप बरंच क्रिकेट शिल्लक होतं असं मत मांडलं आहे. तसंच कोहलीच्या निवृत्तीने भारतीय संघाचं मोठं नुकसान झाल्याचं म्हटलं आहे.
“विराट मोठा खेळाडू आहे, त्यामुळे नक्कीच मोठं नुकसान आहे. 2011 मध्ये जेव्हा अनेक खेळाडूंना काढण्यात आलं, निवृत्त झाले, निवृत्तीसाठी भाग पाडलं तेव्हा झुकलेला संघ अद्याप नीट उभा राहू शकलेला नाही. पण प्रत्येकाची वेळ येते. मला वाटतं विराट आणि रोहितमध्ये फार क्रिकेट बाकी आहे,” असं योगराज यांनी एएनआयशी संवाद साधताना म्हटलं. आपण युवराज सिंगलाही जेव्हा त्याने निवृत्तीचा निर्णय घेतला तेव्हा होऊ नको असा सल्ला दिल्याचं सांगितलं.
“मी युवराजला जेव्हा तो निवृत्त होत होता, तेव्हा हा योग्य निर्णय नससल्याचं सांगितलं होतं. जेव्हा एखाद्याला आपण चालू शकत नाही असं वाटतं, तेव्हा त्याने मैदानातून बाहेर पडावं,” असं योगराज म्हणाले. यादरम्यान त्यांनी दोघं वरिष्ठ खेळाडू संघातून बाहेर पडल्याने संघ फुटेल अशी भविष्यवाणीच केली आहे. “जर तुम्ही नवख्या खेळाडूंचा संघ बांधला, तर तो नक्कीच उभा राहणार नाही,” असं ते म्हणाले.
दरम्यान, कोहली आणि रोहितच्या कसोटीतून निवृत्तीच्या निर्णयाबद्दल त्यांचं मत वेगवेगळं होतं. रोहितला त्याच्या फिटनेसवर काम करण्यासाठी कोणीतरी सांगण्याची गरज होती असं परखड मत त्यांनी मांडलं. “कदाचित विराटला त्याच्याकडे आणखी काही साध्य करण्यासाठी काही शिल्लक नाही असं वाटत असेल. मला वाटतं की रोहित शर्माला दररोज त्याला प्रेरित करण्यासाठी फक्त एका व्यक्तीची आवश्यकता होती. उदाहरणार्थ सकाळी 5 वाजता उठून धावायला जा सांगणारी,” असंही त्यांनी सांगितलं.
पुढील पिढीच्या खेळाडूंसाठी आता ड्रेसिंग रुममध्ये कोणताही वरिष्ठ खेळाडू राहिलेला नाही असंही योगराज म्हणाले. “रोहित आणि विरेंद्र सेहवाग हे दोन खेळाडू लवकर निवृत्त झाले. महान खेळाडूंनी वयाच्या पन्नाशीपर्यंत खेळायला हवं. आता तरुण खेळाडूंना प्रेरणा देण्यासाठी कोणीही राहिलं नाही याची खंत आहे,” असंही ते म्हणाले.
20 जूनपासून हेडिंग्ले येथे सुरू होणाऱ्या पाच कसोटी सामन्यांच्या इंग्लंड मालिकेतून भारताच्या पुनर्बांधणीची सुरुवात करण्याचे काम शुभमन गिलकडे सोपवण्यात येणार आहे. 25 वर्षीय गिल आतापर्यंत कसोटीत अपेक्षित कामगिरी करु शकलेला नाही. 2020 मध्ये पदार्पणापासून त्याने 32 कसोटी सामन्यांमध्ये 35.5 च्या सरासरीने 1983 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये पाच शतके आहेत.
[ad_2]