[ad_1]
Bengluru Stampede Case : अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर आयपीएल 2025 च्या फायनल सामन्यात आरसीबीने पंजाब किंग्सवर विजय मिळवून ट्रॉफी जिंकली. या विजयासह आरसीबीने 18 वर्षांचा ट्रॉफीचा दुष्काळ दूर केला आणि पहिली आयपीएल ट्रॉफी उंचावली. या विजयाची जेवढी प्रतीक्षा खेळाडूंना होती तितकीच आरसीबीच्या चाहत्यांना सुद्धा होती. 4 जून रोजी बंगळुरूच्या चिन्नस्वामी स्टेडियमपर्यंत आरसीबीची (RCB) विजयी मिरवणूक काढण्यात आली, मात्र या मिरवणुकीला आणि सेलिब्रेशनला गालबोट लागलं. चिन्नस्वामी स्टेडियम परिसरात झालेल्या चेंगराचेंगरीत तब्बल 11 जणांचा मृत्यू झाला. यानंतर पोलिसांची परवानगी नसताना देखील ही विजयी मिरवणूक काढण्यात आल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर आरसीबीने पोलिसांची परवानगी नसताना या विजयी मिरवणूकीसाठी एवढी घाई का केली असा प्रश्न उपस्थित केला जात असताना त्यामागचं धक्कादायक कारण आता समोर आलं आहे.
अधिकृत परवानगी नसताना सुद्धा आयोजन :
ESPNcricinfo च्या रिपोर्टनुसार, पोलिसांनी आपल्या FIR मध्ये नमूद केलं आहे की, रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूला स्टेडियममध्ये कोणताही सार्वजनिक कार्यक्रम घेण्याची अधिकृत परवानगी देण्यात आलेली नव्हती. तरीदेखील संघ व्यवस्थापन, स्टेडियमचे प्रशासन आणि आयोजकांनी मिळून एवढा मोठा कार्यक्रम ठेवला आणि त्यामुळे खूप गर्दी निर्माण झाली. ही गर्दी काही काळातच नियंत्रणाबाहेर गेली आणि दुर्घटना घडली.
कब्बन पार्क डिव्हिजनचे पोलीस निरीक्षक गिरीश ए.के. यांच्या तक्रारीवरून दाखल करण्यात आलेल्या या एफआयआरमध्ये भारतीय दंड विधानाच्या 6 गंभीर कलमांचा समावेश आहे. यात कलम 105 (गैर इरादतन हत्या), कलम 115 (जाणीवपूर्वक इजा करणे), कलम 118 (घातक शस्त्र वापरून गंभीर दुखापत करणे), कलम 125 (इतरांचे प्राण किंवा सुरक्षिततेला धोका पोहोचवणे), कलम 132 (शासकीय कर्मचाऱ्यांच्या कर्तव्यात अडथळा आणणे) आणि कलम 190 (बेकायदेशीर जमाव) इत्यादींचा समावेश केला आहे. या प्रकरणी आता पोलीस ऍक्शन मोडमध्ये आले असून त्यांनी आरसीबीचा मार्केटिंग हेड निखिल सोसले (Nikhil Sosale) सह तीन लोकांना अटक केली आहे.
हेही वाचा : मुंबई इंडियन्सने केलं नाही रिटेन, रोहित शर्मानंतर जवळच्या मित्रानेही तडकाफडकी जाहीर केली निवृत्ती
विराट कोहलीच्या लंडनवारीमुळे घाई?
बंगळुरूमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये 11 जणांनी आपला जीव गमावल्यावर सोशल मीडियावर आरसीबी संघावर लोक नाराजी व्यक्त करत आहेत. अशातच सूत्रांच्या माहितीनुसार, बंगळुरू पोलिसांनी विजयी मिरवणुकीच्या आयोजनासाठी आरसीबीकडून 2 दिवस देण्याची मागणी केली होती. परंतु आरसीबीतील एका वरिष्ठ खेळाडूला गुरुवारी लंडनला जायचं होतं. त्या खेळाडूने संघाला आणि पोलिसांना विनंती केली की त्यांनी लवकरात लवकर बंगळुरूमध्ये विजयी मिरवणुकीची तयारी करावी. पोलिसांना याच्या आयोजनासाठी पुरेसा वेळ मिळाला नाही आणि परिणामी झालेल्या चेंगराचेंगरीत 11 जणांना आपला जीव गमवावा लागला. मात्र या माहितीची झी 24 तास कोणतीही पुष्टी करत नाही. सोशल मीडियावर आणि काही प्रसार माध्यमांच्या सोशल मीडिया साईटवरून संबंधीत माहिती देण्यात आलेली आहे.
आरसीबीचा तो वरिष्ठ खेळाडू विराट कोहली असल्याची चर्चा सोशल मीडियावर आहे. यापूर्वी अनेकदा विराट कोहली क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यावर कुटुंबासह लंडनला शिफ्ट होणार अशी माहिती समोर आली होती. विराटच्या लहानपणीच्या कोचने स्वतः याबाबत खुलासा केला होता. विराट कोहली भारतीय संघाकडून खेळत नसताना तो पत्नी अनुष्का आणि मुलांसह लंडनला जातो आणि त्यांच्या सोबत वेळ घालवतो. विराटचा मुलगा अकायचा जन्म सुद्धा गेल्यावर्षी लंडनमध्ये झाला होता.
[ad_2]