[ad_1]
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या एका प्रकरणात वांद्रे कोर्टाने गुरुवारी सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांना नोटीस बजावली आहे. यामुळे चव्हाण यांच्या अडचणींत भर पडण्याची शक्यता आहे.
.
अंजली दमानिया यांनी सरपंच संतोष देशमुख हत्याकांड व कृषि घोटाळ्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांची पुरती कोंडी केली होती. त्यांनी मुंडेंवर मंत्रिमंडळाची मंजुरी नसताना खोटा शासनादेश काढून कृषि खात्याची शेकडो कोटींची रक्कम लाटल्याचा आरोप केला होता. या पार्श्वभूमीवर सूरज चव्हाण यांनी दमानिया यांचा उल्लेख सुपारीबाज व रिचार्जवर चालणारी बाई असा केला होता. सूरज चव्हाण यांच्या या टीकेनंतर अंजली दमानिया यांनी त्यांच्याविरोधात मानहानीचा दावा दाखल केला होता.
सूरज चव्हाण यांना 28 जुलैला हजर राहण्याचे आदेश
या प्रकरणी गुरुवारी वांद्रे कोर्टात सुनावणी झाली. त्यात कोर्टाने सूरज चव्हाण यांना नोटीस बजावली. अंजली दमानिया यांनी याविषयी बोलताना सांगितले की, मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सूरज चव्हाणांवर वांद्रे कोर्टात मानहानीची याचिका दाखल केली होती. ते मला ‘सुपारीबाज बाई’ ‘रीचार्ज वर चालणारी बाई’ म्हणाले होते. या प्रकरणाची आज सुनावणी झाली. त्यानंतर मॅजिस्ट्रेट कोर्टाने सूरज चव्हाण यांच्याविरोधात नोटीस काढून त्यांना 28 जुलै रोजी कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले.
आता पाहू काय म्हणाले होते सूरज चव्हाण?
सूरज चव्हाण आपल्या एका पोस्टमध्ये म्हणाले होते की, धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करण्यासाठी रिचार्जवाल्या ताईच्या खात्यावर 25 खोक्यांचा बॅलन्स टाकण्यात आला आहे. काहीही काम न करता वर्षाला 15 देश फिरणाऱ्या आणि अडीच कोटी रुपयांचा टॅक्स भरणाऱ्या स्वयंघोषित समाजसेविका ताई, कोणाच्या माध्यमातून तुमचा रिचार्ज झाला हे आम्ही पुराव्यांसह लवकरच बाहेर काढू.

अंजली दमानियांनी दिले होते बँक खाते तपासण्याचे आव्हान
सूरज चव्हाण यांच्या या टीकेनंतर अंजली दमानिया यांनी त्यांना आपले बँक खाते तपासण्याचे थेट आव्हान दिले होते. त्या या प्रकरणी आपला संताप व्यक्त करताना म्हणाल्या होत्या, खूप राग आला आहे, तरीही मी माझ्या भाषेची पातळी सोडणार नाही. आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवारांना माझा थेट आव्हान आहे. ताबडतोब माझे सगळेच्या सगळे खाते तपासा. कुठेही एक दमडी देखील unaccounted आहे का ते पाहा.
इतका अमाप भ्रष्टाचार होतोय आणि मी लढू नये? स्वतःच्या जिवाची पर्वा न करता लढणाऱ्या लोकांचा असा मानसिक छळ करणार? राजकारणात पुढे जाण्यासाठी, नेत्याला खुश करण्यासाठी खालच्या पातळीला जाऊन हे बोलतात ना? योग्य आहे हे?
महाराष्ट्राच्या मीडियाला माझ्या लढ्याबद्दल जरा पण आदर असेल, तर अजित पवार व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ह्यावर आजच्या आज प्रतिक्रिया घ्यावी. दोघांनाही माझी विनंती, माझी ताबडतोब चौकशी करावी, माझ्या सगळ्या खात्यांची ताबडतोब चौकशी करावी. होऊन जाऊ दे. मी भ्रष्ट असेन तर मला शिक्षा झाली पाहिजे आणि नसेल तर मग ह्या सूरज चव्हाणला योग्य ती शिक्षा द्यावी, असे दमानिया यांनी म्हटले होते.
[ad_2]