[ad_1]
एप्रिल महिन्यातील अवकाळी पावसाने पश्चिम विदर्भातील ३ हजार २४३ हेक्टर जमीन अक्षरश: धुऊन काढली. एवढ्या जमिनीवरील सर्व पिके नष्ट झाली असून महसूल प्रशासनाने शासनाकडे ९ कोटी रुपयांच्या अनुदानाची मागणी केली आहे.
.
प्रशासकीय नोंदीनुसार एप्रिल महिन्यातील अवकाळी पाऊस, वादळ-वारा आणि विज पडून २२ तालुक्यांतील १८१ गावांमध्ये मोठे नुकसान झाले. शेतजमीनीवरील पिकांना पोचलेल्या हानीशिवाय या गावांमधील २५ घरांची पडझड झाली. शिवाय दोन गोठेसुद्धा भुईसपाट झाले. वीज पडून एका व्यक्तीचा मृत्यू ओढवला, तर ११ जनावरांनाही प्राणास मुकावे लागले. अमरावती जिल्ह्यातील ६ तालुक्यांच्या ७ गावांमध्ये अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला. त्यामुळे ७९४.०७ हेक्टर जमीनीवरील पिके नष्ट झाली. कांदा, पपई, गहू, संत्रा, केळी अशी पिके या जमीनीत होती. इतर जिल्ह्यांच्या तुलनेत झालेले हे दुसऱ्या क्रमांकाचे नुकसान आहे.
शेती पिकांचे सर्वाधिक नुकसान बुलडाणा जिल्ह्यात नोंदले गेले. या जिल्ह्यातील १० तालुक्यांच्या १६६ गावांना अवकाळी पावसाचा फटका बसला. त्यामुळे २४३६.३९ शेतजमिनीवरील पिकांचे नुकसान झाले. रब्बी मका, गहू, तीळ, भुईमूग, कांदा यासह भाजीपाला आणि फळ पिके या जमीनीत होते. अवकाळी पावसामुळे एक घर पडले असून ५ गुरांचाही बळी गेला. यवतमाळ जिल्ह्याच्या दोन तालुक्यातील ३ गावांत शेती पिकाचे नुकसान झाले नाही. परंतु एका घराची पडझड होऊन पाच गुरु मृत्युमुखी पडली. त्याचवेळी अकोला जिल्ह्यातील दोन तालुक्यांच्या ७ गावांत दोन घरांची पडझड आणि ४ गुरांचा मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे. या जिल्ह्यात शेती पिकांनाही फटका बसला. सुमारे १४ हेक्टर शेतजमिनीवरील कांदा आणि केळी नष्ट झाल्याची नोंद महसूल विभागाने केली आहे.
वाशीममध्ये एका व्यक्तीचा मृत्यू
वाशीम जिल्ह्यातही अवकाळी पाऊस पडला. परंतु या पावसामुळे शेतपिकांचा फारसे नुकसान झाले नाही. काही प्रमाणात तुरळक नोंदी घेण्यात आल्या. परंतु हे नुकसान ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नसल्यामुळे त्यापोटी अनुदान देय नसल्यामुळे तशी मागणी करण्यात आली नाही. मात्र त्या कालखंडात एका व्यक्तीचा वीज पडून मृत्यू झाला. मृत व्यक्तीचे नाव चंदविलास भक्तप्रल्हाद काठोळे असे आहे. ते रिसोड तालुक्यातील कवळा गावचे रहिवासी होते.
उन्हाळा असूनही पावसाळ्यासारखे वातावरण
उन्हाळा ऋतु सुरु असतानाही चक्क पावसाळा वाटावा, असे सध्याचे वातावरण आहे. याला केवळ मे महिनाच अपवाद आहे, असे नाही, तर गेल्या एप्रिलमध्येही जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. स्वाभाविकच या पावसामुळे शेतपिकांचे मोठे नुकसान झाले असून अवकाळी पावसाचा कहर अजूनही अधून-मधून सुरुच आहे.
[ad_2]