अहिल्यानगर- पाथर्डी : केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे आयोजित इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसेस (आयएफएस) परीक्षेत जिल्ह्यातील दोघांनी यश मिळविले आहे. अहिल्यानगरची अश्विनी परकाळे-भगत, तर पाथर्डीचा हरिओम दगडू पालवे यांनी या परीक्षेत बाजी मारली आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी जाहीर झालेल्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतही अहिल्यानगरच्या तिघांनी बाजी मारली आहे.
अश्विनी परकाळे या झुंबर पिंपरी (ता. आष्टी) येथील मूळ रहिवाशी आहेत. त्यांचे वडील देवराव परकाळे हे माध्यमिक शिक्षक म्हणून लोणी सय्यदमीर (ता. आष्टी) येथे कार्यरत आहेत. अश्विनीचे बालवाडी ते दुसरीपर्यंतचे प्राथमिक शिक्षण कन्नड (जि. छत्रपती संभाजीनगर) येथे झाले. तिसरी ते सातवीपर्यंतचे शिक्षण केंद्रीय विद्यालय, कराड (जि. सातारा), त्यानंतर आठवी ते बारावीपर्यंतचे शिक्षण अहिल्यानगर येथील रेसिडेन्शिअल विद्यालयात झाले.
सांगली येथे बी. टेक पदवी घेतल्यानंतर यूपीएससीचा अभ्यास सुरू केला. नाशिक येथील दीपक बाळासाहेब भगत यांच्याशी २०२३ मध्ये विवाह झाला. त्यानंतर ही यूपीएससीचा अभ्यास सुरूच ठेवला. २०२४ मध्ये घेतलेल्या परीक्षा उत्तीर्ण होऊन भारतीय वन सेवेमध्ये निवड झाली आहे.
हरिओम पालवे हे सेवानिवृत्त पशुवैद्यकीय अधिकारी डी. के. पालवे यांचे सूपुत्र आहेत. पालवे यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, महालक्ष्मीवरे (ता. नेवासे) येथे झाले, तर माध्यमिक शिक्षण पाथर्डी येथील तिलोक जैन विद्यालयात झाले. संगणकशास्त्र शाखेतील पदवी त्यांनी डी. वाय. पाटील महाविद्यालयातून प्राप्त केली. स्पर्धा परीक्षांमध्ये त्यांचे सलग तिसरे यश आहे. केवळ सहा महिन्यांपूर्वीच त्यांची निवड पुरवठा अधिकारी म्हणून झाली होती. सध्या ते राहाता येथे पुरवठा अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.
महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत घेतलेल्या राज्यसेवा परीक्षेतही त्यांची सहायक गटविकास अधिकारी म्हणून निवड झाली होती. पाथर्डी तालुक्यातील प्राथमिक शिक्षक महादेव पालवे यांचे ते पुतणे आहेत. त्यांच्या या उल्लेखनीय यशामागे कठोर परिश्रम, चिकाटी आणि सातत्य आहे. या स्पर्धा परीक्षेच्या प्रवासात त्यांना संभाजीनगर महापालिका उपायुक्त संजय केदार, पालघरचे शिक्षणाधिकारी शेषराव बडे यांचे मार्गदर्शन लाभले.