संजीवनी युवा प्रतिष्ठानचा रोजगार महोत्सव उत्साहात संपन्न
कोपरगाव प्रतिनिधी : आजच्या पिढीची युवाशक्ती हुशार आणि तंत्रज्ञानाने युक्त आहे, कुठल्याही क्षेत्रातील नोकरी मिळवितांना स्वयंशिस्त, आत्मविश्वास आणि ध्येयाच्या जोरावर युवक सामोरे गेल्यास त्यात निश्चित यश मिळते असे प्रतिपादन संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी केले. युवानेते विवेक कोल्हे यांच्या संकल्पनेतून संजीवनी युवा प्रतिष्ठान आयोजित रोजगार मेळावा उत्साहात पार पडला असून शेकडो युवकांना एम.एन.सी कंपन्यांमध्ये रोजगाराची संधी या माध्यमातून मिळाली आहे.
संजीवनी युवा प्रतिष्ठानच्यावतीने कारखाना कार्यस्थळावर बुधवारी नोकरी महोत्सवाचे आयोजन करण्यांत आले होते त्याचे उद्घाटन क्रेडाईचे अध्यक्ष उद्योजक राजेश ठोळे यांच्या हस्ते करण्यांत आले. त्याप्रसंगी ते अध्यक्षपदावरून बोलत होते.
माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांच्या प्रतिमेचे पुजन यावेळी करण्यात आले..सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेकभैय्या कोल्हे यांच्या संकल्पनेतुन नोकरी महोत्सवाचे आयोजन करण्यांत आले असुन त्याचे हे दुसरे वर्ष असल्याचे अमृत संजीवनी शुगरकेन संस्थेचे अध्यक्ष पराग संधान यांनी सांगितले. मानव संसाधन विकास अधिकारी विशाल वाजपेयी यांनी मुलाखत द्यायची यासह छोट्या छोटया गोष्टींची माहिती दिली.
राजेश ठोळे याप्रसंगी बोलतांना म्हणाले की, कोपरगांव सारख्या ग्रामिण भागात सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे युवा अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी पुणे मुंबई आदी शहरातील मल्टीनॅशनल कंपन्यांचे प्रतिनिधींना बोलावून येथील सुशिक्षित बेरोजगारांच्या हाताला काम कसे मिळेल हा विशाल दृष्टीकोन ठेवुन सलग दुस-यावर्षी नोकरी महोत्सवाचे आयोजन केले, त्यांचा हा उपक्रम कौतुकास्पद आहे.
याप्रसंगी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे संचालक बाळासाहेब वक्ते, प्रभारी कार्यकारी संचालक तथा साखर सरव्यवस्थापक शिवाजीराव दिवटे, विविध संस्थांचे आजी माजी पदाधिकारी, खाते प्रमुख, उपखातेप्रमुख, युवासेवक रोहित कनगरे, कार्यकर्ते उपस्थित होते. भाजपा तालुकाध्यक्ष विशाल गोर्डे यांनी आभार मानले.