पुण्यातील बहुचर्चित वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणात नाव आल्यामुळे राज्य सरकारने विशेष पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांच्याकडील नाशिक, संभाजीनगर व नागपूर कारागृह उपमहानिरीक्षक पदाचा कार्यभार काढला आहे.
.
जालिंदर सुपेकर हे वैष्णवी हगवणे यांचे मेहुणे आहेत. त्यांच्या दबावामुळे वैष्णवी आत्महत्या हुंडाबळी प्रकरणातील संशयित आरोपी असणाऱ्या हगवणे कुटुंबीयांवर कडक कारवाई होत नसल्याचा आरोप केला जात होता. विशेषतः वैष्णवीचे वडील अनिल कस्पटे यांनीही या प्रकरणी सुपेकरांवर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुपेकरांना त्यांचा या प्रकरणात काही संबंध आढळला तर कारवाई करण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील गृह खात्याने सुपेकरांकडील नाशिक, छत्रपती संभाजीनगर व नागपूर कारागृह उपमहानिरीक्षक पदाचा कार्यभार काढला आहे.
काय नमूद आहे सरकारच्या आदेशात?
सरकारच्या आदेशानुसार, ‘कारागृह उप महानिरीक्षक’ हे कारागृह विभागातील अत्यंत महत्वाचे व जबाबदारीचे पद आहे. सध्या कारागृह विभागाच्या ‘कारागृह उप महानिरीक्षक’ या संवर्गात 5 पदे मंजूर आहेत. त्यापैकी 2 पके भरलेली असून, 3 पदे रिक्त आहेत. जालिंदर सुपेकर यांच्याकडे ‘विशेष पोलिस महानिरीक्षक, मुख्यालय, कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे’ या पदाचा नियमित कार्यभार आणि कारागृह विभागातील ‘कारागृह उप महानिरीक्षक’ या संवर्गातील 5 पदांपैकी रिक्त असलेल्या 3 पदांचा (नाशिक विभाग, मध्य विभाग, छत्रपती संभाजीनगर व पूर्व विभाग, नागपूर) अतिरिक्त कार्यभार आहे.

‘विशेष पोलिस महानिरीक्षक, मुख्यालय कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य पुणे’ हे जबाबदारीच्या दृष्टीने ‘अपर पोलिस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य’, या पदानंतर महत्वाचे पद आहे. त्यामुळे जालिंदर सुपेकर यांच्याकडे ‘कारागृह उप महानिरीक्षक’ या संवर्गातील तिन्ही रिक्त पदांचा अतिरिक्त कार्यभार ठेवणे प्रशासकीयदृष्ट्या उचित नाही.
तसेच ‘कारागृह उप महानिरीक्षक’ या कनिष्ठ सवर्गातील पदाचा कार्यभार ‘विशेष पोलिस महानिरीक्षक, मुख्यालय, कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे’ या वरिष्ठ संवर्गातील पदावर कार्यरत असलेल्या अधिकाऱ्याकडे सोपवणे योग्य नाही.
त्यामुळे जालिंदर सुपेकर यांच्याकडील ‘कारागृह उप महानिरीक्षक’ या संवर्गातील तिन्ही रिक्त पदांचा अतिरिक्त कार्यभार कारागृह विभागातील इतर अधिकाऱ्याकडे सोपवण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुसार त्यांच्याकडील पूर्व विभाग नागपूरचा पदभार स्वाती साठे, कारागृह उप महानिरीक्षक, पश्चिम विभाग, पुणे यांच्याकडे, नाशिकचा पदभार अरुणा मुगुटराव, अधीक्षक नाशिक रोड मध्यवर्ती कारागृह नाशिक यांच्याकडे, तर छत्रपती संभाजीनगरचा पदभार वैभव आगे अधीक्षक मध्यवर्ती कारागृह नागपूर यांच्याकडे सोपवला जात आहे, असे सरकारने आपल्या आदेशात म्हटले आहे.

हे ही वाचा…
फक्त 4 लोक माझा कार्यक्रम पाहतात:कृपया मला दुर्लक्षित केले जाऊ शकते का? कॉमेडियन कुणाल कामराचा मुख्यमंत्री फडणवीसांना टोला
मुंबई – राजकीयदृष्ट्या मला दुर्लक्षित करणे चांगले. माझी कोणतीही औकात नाही. फक्त 4 लोक माझा कार्यक्रम पाहतात. त्यामुळे कृपया मला दुर्लक्षित केले जाऊ शकते का? असा सवालवजा टोला कॉमेडियन कुणाल कामराने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हाणला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राच्या कार्यक्रमात बोलताना कुणाल कामरासारख्या व्यक्तीकडे दुर्लक्ष करणे केव्हाही चांगले असल्याचे मत व्यक्त केले होते. मला विचाराल तर कुणाल कामरा सारख्या व्यक्तीला राजकीयदृष्ट्या दुर्लक्ष करणेच योग्य ठरेल. त्यांचा कोणताही दर्जा नाही. तुम्ही त्यांचा दर्जा वाढवता. आमचा पक्ष आणि आमच्या युतीतील मित्रपक्षही थोडे भावनिक आहेत. आम्ही व्यावहारिक (प्रॅक्टिकल) राजकारणी नाही. आम्ही थोडे भावनिक आहोत. ही भावनाच आपल्याला थोडी प्रतिक्रिया देण्यास भाग पाडते. त्यामुळे तुम्ही माझे मत विचाराल तर मी म्हणेन की, प्रतिक्रिया दिल्यानंतरच त्यांना जास्त महत्व मिळाले. 4 लोकही त्यांना ऐकत नाहीत. वाचा सविस्तर