उरण दि ३१(विठ्ठल ममताबादे )
बी.सी. ठाकूर यांचे प्रत्येक क्षेत्रातील कार्य हे प्रेरणादायी असेच आहे. त्यांनी प्रत्येक क्षेत्रात आपल्या कामाचा ठसा उमटविला आहे.आजच्या तरुण पिढीला बी.सी. ठाकूर यांचे कार्य मार्गदर्शक तर आहेच. शिवाय तालुक्यासाठी प्रेरणादायी ठरणारे आहे. असे गौरउद्गार काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांनी चिरनेर येथे काढले. महावितरण कंपनी पनवेल शाखेचे प्रधान यंत्रचालक प्रिन्सिपल ऑपरेटर बी.सी. ठाकूर हे २८ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर निवृत्त झाले आहेत. त्यामुळे उरण तालुक्यातील चिरनेर येथील पी.पी. खारपाटील एज्युकेशन सोसायटीच्या प्रांगणात शुक्रवारी ३० मे. रोजी सायंकाळी ७ : ०० वाजता आयोजित करण्यात आलेल्या त्यांच्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमाप्रसंगी महेंद्र घरत आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलत होते.
चिरनेर येथील बी.सी.ठाकूर यांचा पूर्वाश्रमीचा जीवनपट पाहिला तर अंगावर काटा येत असल्याचे महेंद्र घरत यांनी नमूद केले. एकेकाळी त्यांची शिक्षण घेण्याची परिस्थिती नसताना देखील, अगदी हालाखीच्या परिस्थितीत या बुद्धिमान व्यक्तिमत्वाने शिक्षण घेऊन त्यांनी इलेक्ट्रिक बॉर्डात एक महत्त्वाचे उच्च पद मिळविले. या पदावर काम करतांना ग्राहकांची तसेच महावितरण कंपनीची प्रतिष्ठा सांभाळून अत्यंत जबाबदारीने कायद्याच्या कक्षेत राहून त्यांनी काम पाहिले.एवढेच नव्हे तर सामाजिक जबाबदारी म्हणून ते जनसामान्यांसाठी तत्परतेने काम करत आले आहेत.ते दूरदृष्टी लाभलेले धडाकेबाज नेतृत्व आहे. विचारांना दिशा देणारे नेतृत्व आहे. त्यांची समाजाला खूप मोठी गरज आहे. अशा शब्दात घरत यांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला. याप्रसंगी सत्कारमूर्ती बी.सी. ठाकूर आणि यांच्या सहचारिणी माई ठाकूर यांचा सपत्नीक साडी चोळी पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन अनेक चाहत्यांनी सत्कार केला.
तर सत्काराला उत्तर देताना बी.सी. ठाकूर हे अत्यंत भावनिक होऊन त्यांनी आपल्या पूर्वाश्रमीच्या जीवनाचा पाढा वाचला. . या कार्यक्रमासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली होती.