राहुरी फॅक्टरीत तीन बंद घरांची कुलुपे तोडून रोख रकमेसह दागिन्यांवर डल्ला...
चोऱ्यांचे सत्र सुरूच..!पोलिस म्हणतात तुमच्या घरांचे राखण आम्ही करायचे का?
देवळाली प्रवरा / प्रतिनिधी
राहुरी फॅक्टरी येथील सोनाराचे दुकान फोडल्याची घटना ताजी असतानाच आज शनिवारी पहाटेच्या दरम्यान चोरट्यांनी पुन्हा पोलिसांच्या नाकावर टिच्चून तीन बंद घरांचे कुलुपे तोडून सामानाची उचकापाचक करून अज्ञात चोरट्यांनी रोख रक्कमेसह सोन्याच्या दागिण्यावर डल्ला मारला आहे.सोनाराचे दुकान फोडल्यावर पोलिसांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे तीव्र पडसाद उमटले असतानाही आज हि पोलिस मात्र तुमच्या घरांचे आम्ही राखण करायचे असा प्रश्न नागरिकांना करीत असल्याने पोलिसां विषयी तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
राहुरी फॅक्टरी येथील ताहाराबाद रोड लगत असणाऱ्या खेडकर यांचे सोने चांदीचे दुकान फोडल्याची घटना ताजी असतानाच आज पुन्हा राहुरी फॅक्टरी येथील अंबिकानगर भागातील भरवस्तीत असणाऱ्या विष्णू माधव पवार,सागर खडके,किरण थोरात यांच्या बंद घराची कुलुपे तोडून सामानाची उचकापाचक केली.त्यामध्ये किरण थोरात यांच्या कपाटाची उचकापाचक करून रोख रक्कम व सोन्याची दागिने अज्ञात तीन ते चार चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना आज शनिवारी पहाटेच्या सुमारास घडली आहे.
दरम्यान शनिवारी सकाळी चोरी झाल्याचे उघड झाल्या नंतर पोलिसांशी संपर्क साधला असता या भागातील बिट हवालदार यांनी तुमच्या घरांचे आम्ही राखण करायचे असा प्रश्न नागरिकांना करीत असल्याने पोलिसां विषयी तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
राहुरी फॅक्टरी येथे तनपुरे कारखान्याचे शनिवारी मतदान असल्याने शुक्रवारी सायंकाळ पासून मोठ्या प्रमाणात पोलिस या ठिकाणी असताना हि चोरट्यांनी पोलिसांच्या नाकावर टिच्चून तीन बंद घरांचे कुलुपे तोडून रोख रक्कमेसह सोन्याच्या दागिण्यावर डल्ला मारला आहे.चोऱ्यांचा तपास लावण्यात पोलिस अपयशी ठरले आहेत.वाढत्या चोऱ्या लक्षात घेऊन पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरी पोलीस करत आहेत.