आता माफी, पण पुन्हा चुकला तर सोडणार नाही….

0
IMG-20250603-WA0019.jpg

मायणी प्रतिनिधी  : आपणास सार्वजनिक जीवनातून उद्ध्वस्त करण्यासाठी खटाव-माणसह अनेकांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केले आहेत. त्या सर्वांना आपण आता माफ करत आहोत. पण पुन्हा चुकला तर सोडणार नाही. त्या सर्वांच्या डोक्यावर टांगती तलवार आणून ठेवली आहे, असा इशारा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी दिला.
मायणी, ता. खटाव येथे ना. जयकुमार गोरे यांच्या नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. तसेच विविध विकास कामांचा शुभारंभ, लाकार्पण व उद्घाटनही करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी माजी आमदार डॉ. दिलीपराव येळगावकर, केंद्रीय समिती सदस्य भरत पाटील, सौ. सोनिया गोरे, प्रा. बंडा गोडसे, तालुका अध्यक्ष अनिल माळी, दिशा समिती सदस्या सौ. रेणू येळगावकर, ज्येष्ठ नेते रामभाऊ देवकर- पाटील, रघुनाथ घाडगे, शशिकांत मोरे, टी. आर. गारळे, श्रीमंत पाटील, सुरेश शिंदे, अभिजीत येळगावकर उपस्थित होते.

ना. जयकुमार गोरे म्हणाले, वाईट करणारे, चुकीचे चिंतन करणार्‍याचे कधीही भले होत नाही. भाजपा हा काम करणार्‍या माणसांची कदर करणारा पक्ष आहे. लोकांच्या समोर आणलेले चित्र वेगळे अन् प्रत्यक्षात चित्र वेगळे आहे. सामान्य माणसाचे प्रश्न घेऊन तण, मन धन हरपून काम करणार्‍या माणसांना ताकद देण्याचे काम गेली 20 वर्षे आपण करत आलो आहोत. राजकारणात तयार असणार्‍यांना न घेता आपण तिसर्‍या फळीतील सर्वसामान्य कार्यकर्त्यांना ताकद देऊन नेता करण्याचे काम केले आहे. मागच्या निवडणुकीत शब्द दिला त्याप्रमाणे आता दुष्काळी तालुक्यात जलक्रांती होत आहे. जिहे-कठापूर, औंध पाणी योजनेचा प्रश्न लवकरच निकालात निघत आहे. सोळशी धरणातून पाणी घेऊन जिहे-कठापूरचे आठमाही पाणी आणले जाणार आहे. त्यामुळे भविष्यात पाणी प्रश्न सोडून निवडणूक होणार आहेत.

डॉ. दिलीपराव येळगावकर म्हणाले, ना. जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून मायणी परिसरातील अनेक रखडलेल्या कामांना कोट्यवधी रुपयांचा निधी मिळाला आहे. बाह्यवळण रस्ता, सरुताई देवस्थान ट्रस्टची कामे, वलखड रस्ता व इतर कामांना आता चांगली गती मिळणार आहे. यावेळी त्यांनी मायणी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सुरू असलेल्या अनागोंदी कारभाराचा उहापोह करत मंत्री जयकुमार गोरे यांनी लक्ष घालण्याची मागणी केली. यावेळी डॉ. सौ. उर्मिला येळगावकर, पवन देशमुख, सयाजी पाटील, विनोद देशमुख, सूरज पाटील, राजेंद्र लोखंडे, रमेश जाधव, पांडुरंग झगडे उपस्थित होते. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here