बावधन प्रतिनिधी : मोफत पुस्तके, मोफत गणवेश, मोफत मध्यान्ह आहार, खेळायला भरपूर खेळणी. ना फी ना डोनेशन, तरीही जिल्हा परिषदेच्या शाळेत पाल्याला घालणे पालक टाळू लागल्याने शाळा, वर्ग बंद पडण्याची काही ठिकाणी वेळ आली आहे.
आपल्या गावातील शाळा बंद पडणे, पट कमी होणे ग्रामस्थांनाही मनापासून रुचत नाही. त्यामुळेच गावातील शाळा टिकवायचीच, हा निर्धार केलेल्या बावधन (ता. वाई) येथील ग्रामस्थांनी गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत पाल्याचा प्रवेश घेणाऱ्या पालकांची घरपट्टी आणि पाणीपट्टी माफ करण्याचा निर्णय ग्रामसभेत नुकताच घेतला आहे. ग्रामस्थ आणि ग्रामपंचायतीच्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
येथील ग्रामपंचायतीची शुक्रवारी (ता. ३०) सरपंच वंदना कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा झाली. या सभेत विविद विषयांवर चर्चा झाली; पण काही ग्रामस्थांनी गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेचा जिव्हाळ्याचा विषय मांडला. गावात आदर्श प्राथमिक शाळा ही पहिली ते सातवीपर्यंतची शाळा आहे; पण शाळेचा दिवसेंदिवस पट कमी होऊ लागला आहे. वाढत्या शैक्षणिक स्पर्धेच्या युगात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टिकविणे आव्हान झाले आहे. सध्या अनेक गावांतील जिल्हा परिषदेची शाळा सोडून खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये लाखो रुपये फी भरून पाल्यास पाठवत आहेत.
यामुळे गावागावातील शाळा ओस पडू लागल्या आहेत. वास्तविक, गावातील जिल्हा परिषदेच्या शाळांत मोफत प्रवेश, मोफत गणवेश, भोजन मोफत, मोफत पाठ्यपुस्तके आणि उत्तम दर्जाचे शिक्षण मिळते. तरीही पालक आपल्या पाल्यास त्याठिकाणी प्रवेश घेणे टाळतात. बावधन येथेही यापेक्षा वेगळी परिस्थिती नाही; पण आपल्या गावातील शाळा बंद पडू नये, असे सभेतील सर्वांनाच वाटत होते. त्यामुळे ग्रामसभेत शाळेत नव्याने प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांची २०२५- २६ या आर्थिक वर्षातील घरपट्टी आणि पाणीपट्टी माफ करण्याचा ठराव ग्रामपंचायतीचे उपसरपंच उदयसिंह पिसाळ यांनी मांडला. या ठरावाचे सर्वच ग्रामस्थांनी टाळ्यांच्या कडकडाटाने स्वागत केले. सदस्य संदीप पिसाळ, तानाजी कचरे यांनी त्यास अनुमोदन दिले. ठराव एकमताने मंजूर करण्यात आला.
यावेळी ग्रामपंचायत अधिकारी आर. व्ही. चव्हाण, सदस्य विवेक भोसले, विजयकुमार रासकर, हणमंत कांबळे, संतोष भोसले, संतोष ननावरे, पृथ्वीराज कचरे, माजी सरपंच पप्पुराजे भोसले, नारायण पिसाळ आदी मान्यवर आणि ग्रामस्थ उपस्थित होते. बावधन ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांनी घेतलेल्या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे.