मुंबई,ता.१ : ‘महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक २०२४’ हे घटनाविरोधी आणि लोकशाहीस बाधक विधेयक असून,जनतेच्या मूलभूत हक्कांवर गदा आणणारे आहे.त्यामुळे हे विधेयक रद्द करावे,या मागणीसाठी राज्यभर व्यापक लढा उभारण्याचा निर्धार भाकप, माकप,भाकप माले,शेकाप,सकप,लाल निशाण पक्षांसह विविध डाव्या व लोकशाहीवादी पक्ष – संघटनांनी केला आहे. ३० जून रोजी मुंबई येथे सुरू होणाऱ्या विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विराट मोर्चा काढण्यात येणार आहे.तसेच समाज माध्यमांमधून याबाबत प्रचार – प्रसार करुन, सर्व आमदारांच्या घरावर व कार्यालयावर जाऊन हे विधेयक रद्द करावे म्हणून विधानसभा,विधान परिषदेत भूमिका मांडण्याबाबत दबाव निर्माण करण्यासाठी आंदोलन करणार असल्याचे समितीच्या वतीने सांगण्यात आले आहे.
सदर विधेयक मंजूर करण्यापूर्वी विधीमंडळाच्या संयुक्त समितीकडे पाठविण्यात आले.या समितीने जाहीर केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन त्या नुसार आजपर्यंत दिलेल्या तारखेला या विधेयकाला प्रत्यक्ष व दिलेल्या संकेतस्थळावर सुचना व विरोध नोंदवण्यात आला आहे.राज्य भरातून १२००० पेक्षा अधिक हरकती दाखल करण्यात आलेल्या आहेत.एवढ्या मोठ्या प्रमाणावर हरकती दाखल होण्याचे हे पहिलेच उदाहरण आहे.यावरून जनसामान्यांच्या मनात काय आहे हे लक्षात येते.परंतु सदर विधीमंडळाच्या संयुक्त समिती ने कोणालाही प्रत्यक्ष म्हणणे मांडण्याची संधी दिलेली नाही.हे लोकशाही प्रक्रियेला साजेसे नाही.याचा आम्ही निषेध करतो.
याअंतर्गत २२ एप्रिल रोजी जनसुरक्षा विधेयकाविरोधात राज्यातील सर्व तहसील कार्यालये,जिल्हाधिकारी कार्यालये याठिकाणी निदर्शने करण्यात आली होती. राज्यातील सर्व जिल्ह्यात व एकूण ७८ ठिकाणी या विधेयकाचा निषेध करण्यासाठी आंदोलन करण्यात आले होते .
महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक २०२४ या विषयावर सविस्तर अभ्यास करून या विधेयकाला विरोध करण्यासाठी जनसुरक्षा विधेयक विरोधी समिती तातडीने कृती कार्यक्रम हाती घेतला.राज्यात विभागीय मेळावे घेऊन या विधेयकाला विरोध का करायचा,याबाबत जनतेपर्यंत माहिती पोहोचवून जनमत तयार करण्यात आले.
विधेयकानुसार जो कोणी बेकायदेशीर संघटनेचा सदस्य असेल किंवा अशा कोणत्याही संघटनेच्या बैठकामध्ये भाग जाईल किंवा त्यांना देणगी देईल किंवा स्वीकारेल अशा लोकांना तीन वर्ष कारवास किंवा तीन लाख रुपये दंडाची शिक्षा होऊ शकेल.
या विधेयकाच्या द्वारे प्रशासनाला अतिरेकी अधिकार दिले जात आहेत. कोणत्याही व्यक्तीवर संशय आल्यास,त्याच्यावर कठोर कारवाई करता येईल,ज्यामुळे सरकारी यंत्रणा जनतेच्या मुलभूत अधिकारांवर गदा आणू शकेल.विरोधी विचारसरणी किंवा सरकारविरोधी भूमिका घेणाऱ्या व्यक्ती किंवा संघटनांना सहजपणे ‘अन्याय्य’ ठरवून त्यांच्या हालचालींवर निर्बंध आणता येऊ शकतात.हा प्रकार लोकशाहीत असलेल्या वैचारिक मतभेदांचा आदर न करणारा आहे.
काही प्रकरणांमध्ये सरकारला न्यायपालिकेच्या भूमिकेत हस्तक्षेप करण्याचेही स्वातंत्र्य दिले गेले आहे,ज्यामुळे स्वायत्त आणि स्वतंत्र न्यायपालिकेचा पाया कमकुवत होईल.सरकारच्या धोरणांवर टीका करणे किंवा शांततापूर्ण आंदोलन करणे यांना ‘अन्याय्य कृत्ये’ ठरवले जाऊ शकते,जे लोकशाहीत अभिप्रेत असलेल्या खुल्या चर्चेच्या तत्वा विरोधी आहे.
विधेयकात काही तरतुदी अशा आहेत की ज्यामुळे मूलभूत हक्क जसे की अभिव्यक्ती स्वातंत्र्य,संघटन स्वातंत्र्य आणि न्यायसंगत सुनावणीचा अधिकार यावर परिणाम होईल
थोडक्यात म्हणजे हे विधेयक लोकशाही तत्त्वांना बाधा आणणारे आणि सत्ताधारी प्रशासनाला जास्त अधिकार प्रदान करून नागरिकांच्या हक्कांची गळचेपी करण्याचा धोका निर्माण करणारे आहे.म्हणून या विधेयकाच्या विरोधात ३० जून २०२५ रोजी मुंबई मधे जोरदार आंदोलन करण्यात येणार आहे.त्यात जागरूक नागरिक,कामगार कर्मचारी,अधिकारी,शेतकरी,शेतमजूर सर्व भारतीय संविधान प्रेमीनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.असे कळकळीचे आवाहन जनसुरक्षा विधेयक विरोधी संघर्ष समिती ने केले आहे.