अफवा ‍थांबवू या ; सतर्क होऊ या…!

0

संगमनेर / चंद्रकांत शिंदे पाटील

सध्या महाराष्ट्रात ‘मुले पळवणारी टोळी’ आली असल्याच्या अफवांचे पीक जोरात आहे. पालघरमधील साधूंचे हत्याकांड, नंदुरबारमधील राईनपाडा येथे नाथपंथीय डवरी समाजातील पाच भिक्षुकांची ठेचून हत्या’ या घटनांपासून आपण काहीच धडा घेतलेला दिसून येत नाही. समाजाने आता जागृत राहत सारासार विचार करून अफवांची सत्यता तपासणे गरजेचे आहे. कायदा हातात न घेता सतर्क व चाणाक्ष राहत आजूबाजूच्या संशयास्पद घटना, व्यक्तींची माहिती पोलिसांना देणे आवश्यक आहे. 

        माहितीची देवाण-घेवाण करण्यासाठी प्रभावी माध्यम म्हणून व्हॉट्‌स ऍपकडे, सोशल मीडियाकडे पाहिले जाते. माहिती-तंत्रज्ञानाच्या युगात ही माध्यमे खरोखरच प्रभावी आहेत. परंतु, या माध्यमाचा दुरुपयोग होऊ लागला असून, समाजातील काही लोक विवेकशून्य व्यवहार करत कोणतीही शहानिशा न करता ‘मुले पळविणाऱ्या टोळीचे’ फेक व्हिडिओ व फोटो समाजमाध्यमांतून प्रसारित करत आहेत. स्वत:ला सूज्ञ म्हणविणारे आपणही सदर व्हिडिओ, फोटो व अफवांची सत्यता न तपासता फॉरवर्ड करतो. या अफवांमुळे समाजमन प्रक्षुब्ध होत असून निरपराध लोकांचे नाहक बळी जात आहेत. २०१८ मध्ये महाराष्ट्रात अशाच प्रकारे ‘मुले पळवणाऱ्या टोळी’ च्या अफवांचे पीक आले होते. राज्यात अनेक मारहाणीच्या घटना घडल्या होत्या.  अशा अफवांमुळे कागद-काच-कचरा गोळा करणारे लोक, भटके, दारोदार जाऊन भिक्षा मागणारे साधू, बहूरूपी, गावा-गावात जाऊन खेळ, कला सादर करणारे लोक, हातगाडीवर वस्तू विकणारे, हातावर पोट असलेल्या विक्रेत्यांकडे नागरिक संशयाने पाहू लागतात. एखाद्या व्यक्तींने संशय घेतल्यावर मग हळूहळू आजूबाजूचा समुदाय, नागरिक जमा होऊ लागतात. मग त्या जमावाला झुंडीचे स्वरूप  येऊन लोक प्रक्षुब्ध होत कायदा हातात घेत त्या व्यक्तीला रक्तरंजित होईपर्यंत मारहाण करतात. यातून निष्पाप, निरपराध व्यक्तीचा हकनाक बळी जातो. उत्तर महाराष्ट्र, सांगली, सातारा व कोल्हापूर तसेच नागपूर या भागांमध्ये अफवा मोठ्या प्रमाणात पसरविण्यात आल्या. या अफवांची त्या-त्या जिल्ह्यातील पोलीस प्रशासनाने शहानिशा व सखोल चौकशी केली असता या अफवा तथ्यहीन व खोट्या आढळून आल्या आहेत. शाळा, महाविद्यालय, परिसरात पोलिसांची गस्त वाढविण्यात आली आहे. पोलीस यंत्रणा सतर्क असून अशा घटनांना जलद प्रतिसाद दिला जातो. त्यामुळे अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये किंवा मनात भीती बाळगू नये. आपल्या मुलांच्या सुरक्षेची काळजी घ्यावी. असे आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने नागरिकांना वेळोवेळी करण्यात येत आहे. अफवांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्यामुळे पोलीस अफवा निर्माण करणाऱ्या व पसरविणाऱ्या व्यक्तींवर सायबर अ‍ॅक्ट नुसार कारवाई करतात. समाजमाध्यमांवर आक्षेपार्ह कमेंट टाकल्याच्या बऱ्याच प्रकरणांमध्ये पोलिसांनी माहिती-तंत्रज्ञान कायदाच्या ६६ अ कलमाच्या जोडीलाच भारतीय दंडसंहितेचे कलम, २९५ (क), १५१ (१), ५०५ (१)  नुसार गुन्हा नोंदविला आहे. भारतीय दंड संहितेची ही अतिरिक्त कलमे लावल्यामुळेच आक्षेपार्ह पोस्टबद्दल व्यक्तींना अटक झाली आहे. ‘भादंवि’च्या कलम २९५ (क) अन्वये विशेषत्वाने धार्मिक भावना दुखावणे,   १५३ आणि १५३ (अ) अन्वये दंगलीस चिथावणी देणारी, जातीय तणाव किंवा दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करणारी विधाने लिखित वा बोली स्वरुपात केल्यास त्या व्यक्तीवर गुन्हा नोंदवण्याची तरतूद असून, त्यासाठी सहा महिने ते एक वर्षाची तुरंगवास आणि दंड अशी शिक्षा होऊ शकते. तर कलम ५०५ अन्वये, कायदा-सुव्यवस्थेला धक्का लावण्यासाठी आपल्या विधानातून अफवा पसरवणाऱ्यास तीन वर्षांपर्यंत तुरंगावास व दंडाची तरतूद आहे.  या कलमांचा वापर करून पोलीस समाजात अशांतता पसरविणाऱ्या समाजकंटक लोकांच्या मुसक्या आवळत आहेत. समाजमाध्यमांद्वारे फेक न्यूज, द्वेषमूलक वक्तव्य आणि अफवा पसरवणे याबाबत जनतेला जागरुक आणि सतर्क करण्यासाठी पोलीस व प्रशासन काम करत आहे. प्रत्येक जिल्ह्याच्या सोशल मिडिया हँडलद्वारे जनतेपर्यंत वस्तुनिष्ठ व सत्य माहिती पोहाचविली जात आहे. नागरिकांनीही आता समाजमाध्यमांच्या वापराबाबत सजग व शिक्षीत होत अफवांना थारा देऊ नये...!

चौकट :- अफवांवर नागरिकांनी  सतर्क राहून काय काळजी घ्यावी  

(१) संपूर्ण खात्री केल्याशिवाय कोणतेही टेकस्ट मॅसेज, बातमी, इमेज, ऑडिओ, व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसारित करण्याचे टाळावे.

(२) कोणतीही माहिती स्वत: पडताळणी व सत्यता तपासल्याशिवाय फॉरवर्ड करू नका. 

(३) कोणत्याही अफवा पसरविण्यात सहभागी होऊ नये व कोणी असे करत असल्यास तात्काळ पोलिसांना कळवावे.

(४) अनोळखी व्यक्ती आपल्या आजूबाजूच्या परिसरात वावरतांना दिसून येत असेल तर सतर्क होऊन त्या व्यक्तीच्या संशयास्पद हालचाली आपल्या भम्रणध्वनीच्या माध्यमातून रेकॉर्ड करा, आपणास काही संशयास्पद आढळल्यास स्थानिक पोलिसांशी डायल १०० वरून किंवा ११२ या ‘टोल फ्री’ क्रमांकावर संपर्क साधावा.

(५) गैरसमजातून यापूर्वी अनेक अनुचित प्रकार घडले आहेत. त्यामुळे नागरिकांनी कायदा हातात न घेता संबंधित व्यक्तीस मारहाण करू नये. पोलिसांची मदत घ्यावी.

                (संकलन – उपमाहिती कार्यालय, शिर्डी)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here