आपला तो एक संविधान धर्म, तोच भारतीयांनी आचरावा – रोहितकुमार घोटेकर 

0

मुक्ती महोत्सवात भारतीय संविधानावर संकीर्तन सादरीकरणाचा अनोखा प्रयोग 

गुलामांना गुलामगिरीतून मुक्त करण्याची प्रकाश वाट होती – घोटेकर

मुक्ती महोत्सवाची सांगता

येवला (प्रतिनिधी)

मुंबई इलाका दलित वर्ग परिषदेच्या १३ ऑक्टोबर १९३५ रोजी झालेल्या ऐतिहासिक परिषदेत महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली धर्मांतराची ऐतिहासिक घोषणा ही जगातील तमाम प्रकारच्या गुलामांना गुलामगिरीतून मुक्त करण्याची प्रकाश वाट होती. जी प्रकाश वाट येवल्याच्या ऐतिहासिक भूमीतून भीम गर्जनेने केली आहे पुढे तथागत बुद्धाचा धम्म जगाला बहाल करून निशस्त्र क्रांती घडून धर्मांधता,अनिष्ट प्रथा परंपरा रुढी यातून मुक्ती देणारी,सर्वधर्म सन्मान करून मानवी मनात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणारी माणसाला माणूस जोडणारी, जगातील राज्यघटना लिहून सर्व धर्म ग्रंथांचा अभ्यास करून तुम्हाला मला संविधानरूपी राष्ट्रग्रंथ देतात ही जगातील ज्ञानदानाची परमोच्च किमया असल्याचे उदगार भारतीय संविधान संवर्धक व प्रचारक भा.सं.सं.प्र रोहितकुमार घोटेकर यांनी काढले. धर्मांतर घोषणेच्या ८७ व्या वर्धापन दिनानिमित्त भारतीय संविधान संकीर्तन सादर केले त्यावेळी ते बोलत होते.

आपला तो एक संविधान धर्म,तोच आचरावा भारतीयांनी।सव्वीस नोव्हेंबर एकुणिसे एकोणपन्नास रोजी अर्पिला लोकांनी स्वतःशी। लोकशाही,समता,स्वातंत्र्य,न्याय बंधुता,धर्मनिरपेक्षता, हेच तत्व अंगीकारावे।राष्ट्राची एकता-एकात्मता।उध्दार देशाचा करण्यासाठी।संविधान उद्देशिक कोरा काळजावर।तीच आचरा जीवनभर। ह्या शरद शेजवळ लिखित संविधान अभंगाचे सविस्तर निरूपण घोटेकर यांनी केले.

 कोणत्याही व्यक्तीला आपले वैयक्तिक,सार्वजनिक जीवन जगतांना धर्म आवश्यक असतोच पण माणूस धर्मकर्ता की धर्म माणसा करता याचे चिंतन होणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.कोणतेही राष्ट्र केवळ धर्म-धर्मग्रंथ यावर चालू शकत नाही तसे असते तर जगाच्या पाठीवर धर्मावर देश उभे राहिले असते असे सांगून राष्ट्राला राज्यघटना-संविधान आवश्यक असते असे घोटेकर म्हणाले.

         भारतातील धर्मव्यवस्थेला कमीत कमी धक्का बसेल व रक्ताचा एक थेंबही सांडू न देता बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतराची किमया केली आहे. भारताला राष्ट्र म्हणून अखंड-अभंग ठेवण्याचे सामर्थ्य केवळ भारतीय संविधानातच आहे म्हणून भारतीयांनी प्रथमतः व अंतिमतः भारतीयच असले पाहिजे व आपला धर्मग्रंथ भारतीय संविधान अंगिकरून आचरण केले पाहिजे असे घोटेकर म्हणाले. भारतीय संविधान लोकमानसात रुजण्यासाठी  साहित्यिक,सांस्कृतिक क्षेत्राच्या माध्यमातून प्रयत्न होते गरजेचे असून संविधान संकीर्तन-कीर्तन हा राष्ट्र संत तुकोबा,गाडगेबाबा, तुकडोजी महाराज यांनी बुद्धा पासून धम्म संगिनी धम्म प्रवचन वारसा असून नव्या सांस्कृतिक मांडणीतून भारतीय संविधानाचा  कीर्तन-प्रवचनातून संस्कार केला जावा असे मत यावेळी बोलताना शरद शेजवळ यांनी प्रास्ताविकात व्यक्त केले.

     कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अझर शहा हे होते.प्रारंभी राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेला अभिवादन करून इकरा शहा हिने भारतीय संविधानाची उद्देशिका म्हणून कार्यक्रमात चे उदघाटन करण्यात आले.संविधान कीर्तनकार रोहितकुमार घोटेकर यांना कुणाल ठाकरे,साक्षी गुंजाळ,प्रांजल पवार,राधा घोडेराव,आदर्श सोनावणे,मनोज गुंजाळ,संकेत गुंजाळ,समीक्षा धिवर(टाळ)अनुष्का धिवर(विना), सिद्धार्थ गुंजाळ (पखवाज) वाद्याची साथसंगत केली.ह्या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते सविता धिवर,सुरेश खळे मामा,महेंद्रभाऊ पगारे,अभिमन्यू शिरसाट,अशोक पगारे,विकास वाहुळ हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वसंत पवार,सुमित गरुड,अक्षय गरुड,ललित भांबेरे,साहिल जाधव,रोहित गरुड,सचिन गरुड आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक शरद शेजवळ,सूत्रसंचालन राजरत्न वाहूळ तर आभार अधीक्षक बी.डी.खैरनार यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here