पैठण,दिं.५ : पैठण तालुक्यातील बालानगर फाटा येथे देशी दारूची चोरटी वाहतूक करणाऱ्या एका व्यक्तींवर स्थानिक गुन्हे शाखा व पैठण एमआयडीसी पोलिसांनी संयुक्त कारवाई केली. या वेळी पोलिसांनी त्याच्या ताब्यातुन १४ हजार ४०० रुपयांची देशी दारू व ३० हजार रुपयांची दुचाकी असा ४४ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी तालीम शेख (रा. कडेठाण ता. पैठण) याच्यावर दारूबंदी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत एम आय डी सी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत बिडकीनहून ढोरकीन मार्गे कडेठाण येथे एक व्यक्ती दुचाकीवरून बेकायदेशीर देशी दारू घेऊन जाणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल नेहुल, सहाय्यक पोलीस निरीक्षक भागवत नागरगोजे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे एस. डी. भुमे, निकम, पैठण एमआयडीसी पोलिस ठाण्याचे कर्तारसिंग सिंगल यांनी ढोरकीन ते बालानगर जाणाऱ्या रस्त्यावर बालानगर फाट्यावर सापळा रचून दबा धरून बसले होते. त्यांना पहाटे पावने पाच वाजेच्या सुमारास एक दुचाकी येताना दिसली. त्या गाडीला संशयावरून अडविले असता गाडीच्या पेट्रोल टाकीवर तालीम याच्याकडे १४ हजार ४०० रुपये किमतीचे दोन देशी दारूचे बॉक्स मिळून आले. पोलिसांनी दारू व दुचाकी मिळून ४४ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
याप्रकरणी पैठण एमआयडीसी पोलिस ठाण्यात पोलिस कर्मचारी गणपत भवर यांच्या फिर्यादीवरून दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक भागवत नागरगोजे, पोलिस उपनिरीक्षक दिलीप चौरे, पोलिस जमादार करतारसिंग सिंगल करीत आहे.
——–
फोटो : पैठण : पोलिसांनी अवैध देशी दारू पकडली.