चार भावंडांचा मृत्यु ; आ.बाळासाहेब थोरात यांचेकडून बर्डे कुटुंबियांचे सांत्वन

0

संगमनेर : तालुक्याच्या पठार भागातील खंदरमाळवाडी नजीक असणाऱ्या  वांदरकडा येथील बर्डे कुटुंबातील विजेचा धक्का लागून मृत झालेल्या चार बालकांच्या  कुटुंबियांची राज्याचे माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी त्यांच्या घरी जाऊन भेट घेत सांत्वन केले. तसेच घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी असून शासनाच्या वतीने बर्डेे कुटुंबीयांना जास्तीत जास्त मदत मिळावी यासाठी प्रशासनाला सूचना केल्या.
         संगमनेर तालुक्यातील खंदरमाळवाडी गावांतर्गत असलेल्या वांदरकडा येथे शनिवारी पोहण्यासाठी गेलेल्या चार मुलांचा विजेचा धक्का बसून  दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या पार्श्वभूमीवर  आ. बाळासाहेब थोरात यांनी बर्डे  कुटुंबियांचे सांत्वन केले. यावेळी संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकर खेमनर, जि प . सभापती सौ मीराताई शेटे , जि.प. सदस्य अजय फटांगरे, सरपंच शिवाजी फणसे, प्रकाश भालके , सौ.सुनंदाताई भागवत, जयराम ढेरंगे, गौरव डोंगरे, गणेश कजबे आदी उपस्थित होते.यावेळी माजी महसूल मंत्री आ. बाळासाहेब थोरात म्हणाले की,  चार बालकांचा असा मृत्यू होणे हे अत्यंत दुर्दैवी आहे.ही घटना सर्वांचे हृदय हेलकावून टाकणारी आहे. आम्ही सर्वजण या कुटुंबाबरोबर आहोत. ज्या कर्मचाऱ्यांकडून हलगर्जीपणा झाला आहे. त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे.तसेच या घटनेचा सखोल तपास व्हावा. विशेषतः  पावसाळ्यामध्ये दरवर्षी महाराष्ट्रात ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात अशा घटना घडत असतात. त्यामुळे अशा घटना पुन्हा होऊ नये यासाठी सर्वांनी अत्यंत काळजी घेणे गरजेचे असून वीज मंडळांने या विषयाकडे गांभीर्याने पाहत यावर ठोस कृती आराखडा तयार करावा. तसेच सरकारच्या वतीने या  कुटुंबांला जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी अधिकाऱ्यांनी तातडीने कार्यवाही करावी अशा सूचनाही प्रशासन आणि संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी खंदरमाळवाडी सह परिसरातील नागरिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here