संगमनेर : चंद्रकांत शिंदे पाटील
संगमनेर येथून सेफ्टी टॅंक घेऊन साकुरकडे जाणारा छोटा हत्ती टेम्पो आणि साकुर कडून संगमनेरकडे जाणाऱ्या दुचाकीच्या भीषण अपघातात दोन मित्रांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ऐन पाडवा आणि भाऊबीजेच्या दिवशीच या दोन तरुणांवर काळाने घाला घातल्याने संगमनेरच्या पठार भागात हळहळ व्यक्त होत आहे.
साकुर येथील ओम राहुल पेंडभाजे (वय १९) आणि शुभम सदाशिव टेकुडे (वय १८) रा. देवगिरी वस्ती साकुर तालुका संगमनेर हे दोघे मित्र आपल्या ताब्यातील बजाज प्लेटिना दुचाकी नंबर एम.एच १७ सी.जी ९९४८ वरून साकुर येथुन संगमनेर कडे येत होते. तसेच संगमनेर येथून साकुरकडे सेफ्टी टँक घेऊन जाणारा छोटा हत्ती टेम्पो येत होता. ही दोन्ही वाहने बुधवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास पिंपळगाव देपा परिसरात आली असता या दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली. या जोराच्या धडकेने दुचाकी वरील ओम राहुल पेंडभाजे आणि शुभम सदाशिव टेकुडे हे दोघेजण लांब रस्त्यावर फेकले गेले आणि गंभीर जखमी झाले.या अपघाताची माहिती समजल्यावर स्थानिक नागरिकांनी मदत कार्य करीत दोन्हीही जखमींना रुग्णवाहिकेतून संगमनेर येथे औषधोपचारासाठी पाठवले मात्र औषधोपचारापूर्वीच या दोघांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. अपघाताची माहिती मिळतात घारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक एस.एस सातपुते, प्रमोद चव्हाण, हरिश्चंद्र बांडे, संतोष फड यांनी घटनास्थळी धाव घेतली. या दोन्ही तरुणांच्या अपघाती मृत्यूने संगमनेरच्या पठार भागात शोककळा पसरली आहे. यातील मृत दोन्हीही तरुण आपल्या आई-वडिलांना एकुलते एक होते. यातील अमोल पेंडभाजे हा पुणे येथे तर शुभम टेकुडे हा बोटा येथील फार्मसी कॉलेजमध्ये शिक्षण घेत होते. या दोन्ही तरुणांवर ऐन सणासुदीत काळाने घाला घातल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून भाऊबीजेच्या दिवशीच सायंकाळी साकुर येथे त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.