टाटा एअरबस प्रकल्प वाद : सर्व प्रकल्पांची श्वेतपत्रिका काढणार – उदय सामंत

0

मुंबई : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे या दोघांनीही काल (31 ऑक्टोबर) एकमेकांवर महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला जाण्याच्या मुद्द्यावरून आरोप-प्रत्यारोप केले. त्यानंतर आज महाराष्ट्राचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेऊन या प्रकल्पांबाबत श्वेतपत्रिका काढणार असल्याची माहिती दिली.

उदय सामंतांनी महाविकास आघाडी सरकारला उद्देशून प्रश्न विचारले की, “वेदांताच्या बाबतीत 5 जानेवारी 2022 ला अर्ज सादर केल्यानंतर आपण हायपॉवर कमिटीची बैठक का घेतली नाही? ती बैठक शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर का घ्यावी लागली?”

“गाजावाजा करत जे MoU झाले, त्यांची अंमलबजावणी का झाली नाही? त्या अंमलबजावणीसाठी आवश्यक मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक 14 महिने का होऊ शकली नाही? याचं उत्तर महाराष्ट्राला आणि मला मिळालं नाही,” असं उदय सामंत म्हणाले.

कोणाच्या ‘उद्योगां’मुळे प्रकल्प बाहेर गेले? श्वेतपत्रिका काढण्याची उदय सामंतांची घोषणा
तसंच, या सर्व प्रकल्पांची श्वेतपत्रिका काढणार असल्याची माहितीही उदय सामंतांनी दिली.

टाटा-एअरबस प्रकल्प गुजरातमध्ये गेल्यानंतर महाराष्ट्रात राजकीय वातावरण तापलं आहे. विरोधकांकडून सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली जात असताना, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन सरकारची बाजू मांडली.


देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आजच (31 ऑक्टोबर) केंद्र सरकारनं इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर मंजूर केलंय. महाराष्ट्राला इलेक्ट्रॉनिक्स हब म्हणून ते विकसित करतील. आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की, भविष्य हे इलेक्ट्रॉनिकमध्ये आहे. सर्वाधिक गुंतवणूक यात आहे.”
“त्यामुळे एकप्रकारे केंद्र सरकारनं दिलेली ही भेटच आहे. यासोबत लवकरच मला अपेक्षा आहे की, नवीन वर्षात महाराष्ट्राला केंद्र सरकार टेक्स्टाईल पार्क सुद्धा देणार आहेत. यातनं टेक्स्टाईल क्लस्टर सुद्धा तयार होणार आहे. याचं प्रपोजल अंतिम टप्प्यात सादर झालंय. बजेटपर्यंत याची घोषणाही होण्याची शक्यता आहे.”

“एकीकडे महाराष्ट्रात आमचं सरकार येऊन तीनच महिने झाले तरीही एक फेक नेरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न होतोय की, महाराष्ट्रातून उद्योग चालले आहेत. या फेक नेरेटिव्हमध्ये काही राजकीय पक्ष आणि त्यांची इकोसिस्टिम, आणि दुर्दैवाने बोटावर मोजण्याइतके चार-पाच HMV (His Masters Voice) पत्रकार. हे सगळे मिळून महाराष्ट्राच्या बदनामीचा घाट घातलाय,” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

फडणवीस पुढे म्हणाले की, “महाविकास आघाडीच्या अडीच वर्षांच्या कारकीर्दीत भ्रष्टाचार, गृहमंत्री जेलमध्ये, पोलीस आयुक्त जेलमध्ये, वसुली इतके भयानक कांड झाले की, कुणीही महाराष्ट्रात यायला तयार नव्हतं, गुंतवणूक करायला तयार नव्हतं. ही जी महाराष्ट्रातली विस्कटलेली घडी आहे, ती घडी जागेवर आणण्याचा आम्ही प्रयत्न करतोय.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here