शासकीय वसतिगृहात समाजकल्याण विभाग वर्धापनदिन साजरा
सातारा : ’’आज आर्थिक विषमता मोठ्या प्रमाणात समाजात जाणवत आहे. भारतासारख्या बहुविध संस्कृतीच्या देशात शिक्षणाचे खाजगीकरण होत असल्याने भरमसाठ फी असल्याने दर्जेदार शिक्षण घेणे अनेकांना शक्य होत नाही.पारंपारिक शिक्षण असल्याने अनेकजण बेकार स्थिती अनुभवत आहेत.अनेकांचे चांगल्या नोकरीचे व व्यवसायाचे स्वप्न पूर्ण होत नाही.ज्याला शेतीही नाही आणि कसलेच भांडवल देखील नाही अशी अनेक कुटुंबे या देशात काहीतरी मजुरी करून जीवन जगत आहेत त्यांचे जीवनमान राहणीमान यांचा दर्जा देखील चांगला नाही. जे पूर्वीपासून गरिबीत जीवन जगले त्यांना आता उंच आकांक्षा ठेवाव्या अशी स्वप्ने देखील पडणे दुरापास्त होत आहे..अशा परिस्थितीत इथल्या तरूण मनाला साथ कोण देणार ? जोतीराव फुले आणि बाबासाहेब आंबेडकर यांचा कळवळा आणि जाणीव घेऊन जागतिक दर्जाचे व्यवहार उपयोगी उद्योगी शिक्षण राज्य व केद्रशासनाने सर्वाना मोफत दिले पाहिजे तसेच देश व परदेशात त्यांना नोकऱ्या मिळतील यासाठी सहाय्य केले पाहिजे असे मत प्रा.डॉ.सुभाष वाघमारे यांनी व्यक्त केले. १५ ऑक्टोबर १९३२ रोजी महाराष्ट्र राज्याच्या सामाजिक न्याय विन्भागाची स्थापना डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रयत्नातून मुंबई येथे झाली. ते येथील शासकीय वसतिगृहात समाजकल्याण विभागाच्या ९० व्या वर्धापन दिनानिमित्त बोलतते होते.त्या पार्श्वभूमीवर अध्यक्ष म्हणून शासकीय वसतिगृहाचे अधीक्षक सी.टी.बोराटे हे उपस्थित होते.
समाजकल्याण विभाग वर्धापन दिनाच्या निमित्ताने बोलताना ते पुढे म्हणाले की’ ज्ञान घेण्याचा हक्क हा सर्वांचा आहे असे सांगून समतेचे बीजारोपण गौतमबुद्धांनी केले.नैतिक आचरण करीत मध्यममार्ग घेऊन जीवन जगावे हा सदुपदेश त्यांनी दिला. इंग्रजी राजवटीत जोतीराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी सामाजिक न्यायाची भूमिका घेऊन मागास असलेल्या प्रत्येकास स्त्रियांना सुद्धा शिक्षण मिळावे यासाठी कृतीशील प्रयत्न केले. शेतकरी ,कामगार ,मजूर ,स्त्रिया ,अस्पृश्य,विधवा अशा अनेकांच्यासाठी त्यांनी आपले आयुष्य घालवले .सत्यशोधक समाजाच्या विचाराने वाटचाल करून राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी प्रत्यक्षात उपेक्षितांना न्याय मिळावा म्हणून शिक्षण ,नोकरी आदी क्षेत्रात आरक्षण देऊन प्रसंगी विरोध पत्करून न्यायाची अंमलबजावणी केली.उच्च शिक्षण घेऊन नाही रे वर्गाच्या न्यायासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी चळवळी करून ,प्रत्यक्ष भारतीय घटनेत वंचितांच्या हक्काची तरतूद केली.म्हणूनच बुद्ध ,फुले ,शाहू ,आंबेडकर यांचे आदर्श डोळ्यासमोर ठेवून व्यवहारिक शिक्षण घ्यावे.उदास न होता संधी कोणत्या निर्माण होत आहेत ते पाहून आधुनिक शिक्षण घ्यावे.संविधांनाच्या स्वप्नातले गाव आणि भारत उभा करण्याची जबाबदारी आपली आहे याचे भान सर्वांनी ठेवावे असे ते म्हणाले. विषमतेची मुळे गावात असून परंपरा जातीभेद जोपासत असते. याला खतपाणी घालण्याचे काम जातीभेदाने ज्यांचे वर्चस्व कायम राहते ते घेत असतात .म्हणून प्रत्येक गावात बंधुता निर्माण करण्याचे शिक्षण आपण घ्यावे.शासकीय वसतिगृहे ही संविधानिक मुल्ये आचरणात आणणारी आणि प्रसारण करणारी केंद्रे व्हावीत.मन परिवर्तन हाच समता निर्माण करण्याचा मार्ग असून ,न्यायाची समान संधी मिळाली पाहिजे यासाठी शिक्षण घेणाऱ्या प्रत्येक युवक युवतींनी आग्रही राहिले पाहिजे.’असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले. करिअरसाठी आता भारतात केवळ विसंबून न राहता जपानी भाषा शिक्षण घेऊन जपानमध्ये जावे असेही त्यांनी सांगितले. संविधानाच्या स्वप्नातलं गाव हा कविता संग्रह यावेळी त्यांनी भेट दिला प्रारंभी दत्तात्रय खाडे यांनी प्रास्ताविक केले. तर आभार आदित्य लोखंडे यांनी मानले .यावेळी विद्यार्थी प्रतिनिधी साजन केंगार तसेच शासकीय वसतिगृहातील विद्यार्थी उपस्थित होते.