
संगमनेर / चंद्रकांत शिंदे पाटील
राज्यातील काँग्रेसचे वरिष्ठ नेते, राज्याचे माजी महसूल मंत्री तथा काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे गटनेते आमदार बाळासाहेब थोरात यांना येत्या काही काळात दिल्लीत मोठी जबाबदारी मिळणार असल्याचे बोलले जात असून काँग्रेस पक्षाचे अध्यक्षपदाचे प्रमुख दावेदार, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या वक्तव्यातून असे संकेत मिळाले आहेत.
शुक्रवार (दि.२३) सप्टेंबर रोजी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत संगमनेरात आले होते. माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला उपस्थित राहून त्यांनी आमदार बाळासाहेब थोरात यांच्यावर शांत, संयमी नेतृत्व म्हणून स्मृती सुमने उधळत त्यांच्या कार्याचे कौतुक केले. एवढेच नव्हे तर जनमानसातील लोकनेता असे सांगत त्यांनी मोठा जनाधार असलेला नेता म्हणून बाळासाहेब थोरात यांचा उल्लेख केला होता. तसेच खुद्द श्रीमती सोनिया गांधी, खासदार राहुल गांधी यांच्यासहित देशातील काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यात आ.बाळासाहेब थोरात यांना आदराचे स्थान असल्याचा उल्लेख आपल्या भाषणातून आवर्जून केला. त्याचबरोबर गुजरात विधानसभा निवडणुकीचा दाखला देत गुजरात विधानसभा निवडणुकीत मी गुजरात राज्याचा प्रभारी होतो तर बाळासाहेब थोरात काँग्रेसच्या उमेदवार निवड समितीचे अध्यक्ष होते. आम्ही दोघांनी यावेळी सोबत काम केले आणि त्यांच्या कल्पकतेचा अनुभव तेथे आम्हाला आला. गुजरात मध्ये काँग्रेस पक्षाची सत्ता आली नसली तरी गुजरात मध्ये काँग्रेसला त्यांच्यामुळे चांगले यश मिळाल्याचे आवर्जून त्यांनी सांगितले. त्यामुळे जर भविष्यात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्षपद अशोक गेहलोत यांना मिळाले तर राज्यातून आमदार बाळासाहेब थोरात यांना दिल्लीत मोठी जबाबदारी मिळू शकते असे बोलले जात आहे. सध्या आमदार बाळासाहेब थोरात यांच्याकडे काँग्रेसच्या वर्किंग कमिटीचे सदस्य पद आहे. या वर्किंग कमिटीत काँग्रेस पक्षाच्या देशभरातील महत्त्वाच्या नेत्यांचा समावेश असतो. या पदाला काँग्रेस पक्षात मोठे स्थान असून काँग्रेस पक्षाचे देशभरातील निर्णय या वर्किंग कमिटीत होत असतात. माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात १९८५ पासून काँग्रेस पक्षावर व नेतृत्वावर निष्ठा ठेवून आहेत. काँग्रेस पक्षातील अनेक जण आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी पक्षाला सोडचिठ्ठी देऊन गेले. मात्र बाळासाहेब थोरात यांनी पक्षावरील श्रद्धा आणि निष्ठा तसूभर ही ढळू दिली नाही. गत विधानसभा निवडणुकीपूर्वी इतर पक्षाप्रमाणे काँग्रेस पक्षालाही राज्यात मोठे खिंडार पडले होते. स्व:पक्षातील अनेक लोक दुसऱ्या पक्षाच्या कळपात दाखल होत असताना माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी पक्षावरील निष्ठा ढळू दिली नाही. राज्यात काँग्रेस पक्ष प्रचंड अडचणीत असताना वरिष्ठ नेत्यांनी प्रदेश काँग्रेसचे अध्यक्षपद त्यांना बहाल केले आणि आमदार थोरात यांनीही न डगमगता काँग्रेसचा विचार राज्यातील तळागाळातील कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवला. त्याचा परिणाम काँग्रेसचेेेे ४४ आमदार विधानसभेत पोहोचले. राज्यात काँग्रेस संपली म्हणणाऱ्यांना ही मोठी चपराक होती. विधानसभा निवडणुकीत बाजीप्रभू प्रमाणे खिंड लढवत त्यांनी राज्यात काँग्रेसला मानाचे स्थान मिळवून दिले. त्यामुळे दिल्ली दरबारी त्यांचे वजन नक्कीच वाढलेले आहेे. त्यामुळे येत्या काही काळात देशपातळीवर त्यांना मोठी जबाबदारी मिळू शकते असे संकेत यानिमित्ताने मिळू लागले आहेत.