
मुंबई : “कोणालातरी उभं करून अर्ज मागे घ्या अशी विनंती करून घेतली. ‘विनंती करा’ म्हणून विनंती करत फिरत होते,” अशी टीका उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर केली आहे.
“अंधेरी पूर्वमधील उमेदवार मागे घेण्यासाठी काही लोकांनी समोरून विनंती केली, काही लोकांनी मागून विनंती केली,” असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपने अंधेरी पूर्वमधील त्यांचा उमेदवार मागे घेतल्यानंतर केलं होतं. त्याला उद्धव ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
“विनंती करून घेतली. मग तोंडावर आपटू नये म्हणून पळून गेले. नाव आणि चिन्ह ताबडतोप गोठवावं असं काय घडलं होतं? तसंच निवडणूक आयोगाने ज्या तत्परतेने निर्णय घेतला याची गरज नव्हती,” असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.
माजी मंत्री संजय देशमुख यांनी आज (२० ऑक्टोबर) उद्धव ठाकरे यांच्या उपस्थिती शिवसेनेत प्रवेश केला. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
देशमुख यवतमाळच्या दिग्रस मतदारसंघातून १९९९ आणि २००४ मध्ये अपक्ष आमदार निवडून आले होते.
“गेले दोनतीन महिन्यात मी मुख्यमंत्रिपद सोडल्यापासून एकही दिवस असा नाही की लोक शिवसेनेत येत नाहीत,” असं उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकारांशी बोलताना म्हटलं आहे.
“राजकारणाशी संबंध नाही असे लोक, तसंच वेगवेगळ्या धर्माचे लोक आमच्या सोबत येत आहेत. सगळ्यांचं म्हणणं एकच आहे की तुम्ही लढा, आम्ही तुमच्यासोबत आहोत. प्रत्येकवेळी सांगत आलो की माझं काय होणार, शिवसेनेचं काय होणार, हे काय होणार हे ठरवणारे तुम्ही आहात. पण देशाच्या लोकशाहीची काळजी आपल्याला आहे,” असंही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले आहेत.
तसंच जाहीर सभा घ्यायचीच आहे. पोहरादेवीच्या दर्शनाला यायचं आहे, तारीख तुम्ही ठरवा, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना केलं आहे.
“घाईघाईने निवडणूक आयोगाकडे जाऊन आमचं नाव आणि चिन्ह गोठवलं, ठीक आहे. पण मी माझं नाव आणि चिन्ह घेऊन पुढे जात आहे. जे गेलेत ते स्वतः लढले नाहीत, भाजपला पुढे केलं,” असा आरोपसुद्धा उद्धव ठाकरे यांनी केला आहे.
संपूर्ण राज्य माझ्या पाठी उभं राहिलंय. जुने कार्यकर्ते परत आलेत कारण त्यांच्या जाण्याचं कारण दूर झालंय, अशी टीका त्यांनी एकनाथ शिंदे यांचं नाव न घेता केली आहे.