मुरूम माफीयांचा बंदोबस्त करा ; केशवराव शिंदे यांची मागणी

0

संगमनेर : तालुक्यात सध्या वाळू माफियांबरोबरच मुरूम माफियांचा हैदोस सुरू आहे. विशेषतः कोकणगाव, मेंढवण परिसरातून मोठ्या प्रमाणात अवैधरित्या मुरमाचे उत्खनन सुरू असताना स्थानिक महसूल कर्मचारी याकडे जाणून-बुजून दुर्लक्ष करत असून या मुरूम माफियांचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी संघटनेचे माजी तालुकाप्रमुख केशवराव शिंदे यांनी केली आहे.

         तालुक्यातील मेंढवण आणि कोकणगाव परिसरात अनेक मुरूम माफिया तयार झाले असून ते जवळपासचे डोंगर कोरून मुरूम काढत आहेत. कोकणगावात तर शेतातून मुरूम काढून विक्री केली जात आहे. असे असताना स्थानिक महसूलचे तलाठी, कोतवाल अर्थपूर्ण तडजोडीमुळे याकडे जाणून-बुजून दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप शिंदे यांनी केला आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने अनेकांकडून या मुरूम माफीयांना मुरूम टाकण्याच्या ऑर्डर आहेत. त्यामुळे सध्या मुरूम माफीयांना सुगीचे दिवस सुरू आहेत. कुठल्याही प्रकारची परवानगी किंवा रॉयल्टी न भरता हे मुरूम माफिया बिनदिक्कतपणे आपल्या तुंबड्या भरत आहेत. एक डंपर मुरमाचे तब्बल आठ हजार रुपये हे मुरूम माफिया कमवत आहेत. त्यामुळे जनतेची ही मोठ्या प्रमाणात या मुरूम माफियांकडून लूट सुरू आहे. एवढे पैसे मुरमाचे घेतात का ? असे विचारल्यावर मुरूम माफिया आम्हाला वरती पैसे द्यावे लागतात असे सांगत आहेत. त्यामुळे या मुरूम माफियांचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी शेतकरी संघटनेचे माजी तालुकाप्रमुख केशवराव शिंदे यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here