लग्न करून नवरदेवाची फसवणूक ; तालुका पोलिसांनी तोतया नवरीसह चौघांच्या मुसक्या आवळल्या

0

संगमनेर / चंद्रकांत शिंदे पाटील

लग्नाच्या वयात असणारा उपवर मुलगा लग्नासाठी मुली पाहत आहे हे हेरुन त्यास मुलगी दाखवून त्या बदल्यात एक लाख दहा हजार रुपये रोख आणि तथाकथित नववधूचे लग्न लावून दीड तोळा सोन्याचे दागिने घेऊन नव नवरदेवाची व त्याच्या कुटुंबाची फसवणूक केल्याप्रकरणी तोतया नववधूसह तिच्या टोळीत सामील असणाऱ्या तिच्या तथाकथित तोतया नातेवाईकांच्या मुसक्या आवळण्यात संगमनेर तालुका पोलिसांना यश आले आहे.

            याबाबत समजलेल्या माहितीनुसार तालुक्यातील एका गावातील एका तीस वर्षीय तरुणाचे लग्न जमत नसल्याने या तरुणाच्या आई-वडिलांनी आपले नातेवाईक, मित्रमंडळी व परिचयातील व्यक्तींना आपल्या मुलासाठी मुलगी पाहण्याच सांगितले होते. त्यामुळे तालुक्यातीलच या इच्छुक नवरदेवाच्या गावा शेजारील गावात राहणाऱ्या एका बहाद्दराने ६ ऑगस्ट २०२२ रोजी बुलढाणा जिल्ह्यातील लोणार येथे आपल्या परिचयातील एक मुलगी असल्याचे सांगितले. मुलगी दाखवणारा  गावाशेजारील असल्याने या तरुणाने व त्याच्या आईवडिलांनी त्याच्यावर विश्वास ठेवत ७ ऑगस्ट २०२२ रोजी आपले मोजके नातेवाईक व त्या मध्यस्थ बहाद्दराला घेऊन थेट बुलढाणा जिल्ह्यातील लोणार गाठले आणि मुलगी पाहण्याचा कार्यक्रम पार पडला. इच्छुक नवरदेवाला व त्याच्या कुटुंबीयांना मुलगी पसंत पडल्यावर तीनच दिवसांनी म्हणजे ९ ऑगस्ट २०२२ रोजी संगमनेर तालुक्यातील नवरदेवाच्या घरी लग्नाचा बार उडवून देण्याचे निश्चित झाले. यावेळी झालेल्या बैठकीत लग्नाच्या दिवशी मुलीच्या भावाला एक लाख दहा हजार रुपये रोख देण्याचे व लग्नात नववधूच्या अंगावर दीड तोळ्याचे सोन्याचे दागिने घालण्याचे ठरले. त्यानंतर प्रत्यक्ष लग्नाच्या दिवशी नववधू , तिची आजी, भाऊ व अन्य एक असे नवऱ्या मुलाच्या घरी दाखल झाले. त्यानंतर नवरदेवाच्या वडिलांनी ठरल्याप्रमाणे नववधूचा भाऊ असल्याचे सांगणाऱ्या संतोष खोडके याला एक लाख दहा हजार रुपये रोख दिले. त्यानंतर थाटात गावातील व पाहुण्यारावळ्याच्या उपस्थितीत लग्न सोहळा पार पडला. यावेळी नववधूच्या अंगावर दीड तोळा सोन्याचे दागिने घालण्यात आले. हे शुभकार्य पार पडल्यानंतर या तोतया नववधू बरोबर आलेली तिची तोतया आजी भाऊ आणि एक जण असे नववधूचा व नवीन पाहुण्यांचा निरोप घेऊन निघून गेले. त्यानंतर ११ ऑगस्ट २०२२ या लग्नाच्या तिसऱ्या दिवशी रात्री नववधूने आपल्या पोटात दुखत असल्याचे नवरदेवाला सांगितले. त्यामुळे तो गावामध्ये मेडिकल मधून गोळी आणण्यासाठी गेला. ही संधी साधत या तोतया नववधुने तेथून पळ काढला. तब्बल दोन महिने नवरदेव आणि त्याचे कुटुंबीय या नववधूला शोधत होते. मात्र ती त्यांना सापडली नाही. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याची खात्री नवरदेवाची आणि त्याच्या कुटुंबीयांची झाल्यावर त्यांनी तालुका पोलीस ठाणे गाठत आपबिती पोलिसांसमोर कथन केली. त्यानंतर पोलिसांनी या घटनेचा छडा लावायचाच असा चंग बांधला आणि त्यांच्या प्रयत्नांना यश आले.तालुका पोलिसांनी लावलेल्या जाळ्यात नववधू असणारी यशश्री नरहरी केंद्रे (रा. शिवाजीनगर, ता. परळी जिल्हा बीड) तिचा तथाकथित तोतया भाऊ हनुमंत सिताराम गजेॅ (रा. आंबलंवाडी, ता.आंबेजोगाई जिल्हा बीड) तिची तोतया आजी यशोदाबाई आश्रू कराळे (रा. रायेगाव, ता. लोणार, जिल्हा बुलढाणा) आणि संतोष किसन खोडके (रा. जोगेश्वरी, ता. रिसोड, जिल्हा वाशिम) या चौघांना गुरुवारी रात्री संगमनेरात आणल्यावर त्यांच्यावर गुन्हा रजि. नंबर ४४६/२०२२ भा.द.वि कलम ४२०, ३० प्रमाणे दाखल करत त्यांना गजाआड केले आहे. या टोळीने आतापर्यंत कोणा कोणाला टोप्या घातल्या आहेत याचा तपास आता पोलीस करणार असून अनेक प्रकरणाची उकल या निमित्ताने होणार आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ एस.आर बडे करत आहेत.

चौकट :- दलालांचा बंदोबस्त होण्याची गरज..!

सध्या समाजामध्ये मुलांपेक्षा मुली कमी असल्याची ओरड होत आहे. त्यामुळे अनेक विवाह इच्छुक मुलांना मुली मिळत नसल्याची तक्रार ऐकायला मिळते मात्र वास्तव असे आहे की सध्याच्या जमान्यात मुलांपेक्षा मुलीं जास्त शिकलेल्या असल्याने त्या खेड्यातील कमी शिकलेल्या मुलांना नाकारतात. त्यामुळे खेड्यातील अनेक विवाह इच्छुक मुलांचे लग्न रखडलेले आहेत. याचाच फायदा काही दलाल (मध्यस्थ) घेत असून लग्न जमवण्याच्या मोबदल्यात इच्छुक नवरदेवाकडील मंडळीकडून मोठी रक्कम उकळत असतात. त्यामुळे या फसवणाऱ्या टोळ्यांबरोबरच मध्यस्थी करणाऱ्या दलालांचाही बंदोबस्त होण्याची गरज निर्माण झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here