
शेतकऱ्यांनी मोर्च्यात सहभागी व्हाव:- राजेंद्र मुसमाडे
देवळाली प्रवरा / प्रतिनिधी
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असताना शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्याऐवजी शासन वेळखाऊ भूमिका घेऊन शेतकऱ्यांच्या दुःखावर मीठ चोळत आहे. हे शासनाचे धोरण शेतकरी विरोधी आहे. शासनाचे लक्ष वेधण्यासाठी श्रमिक शेतकरी संघटनेच्या वतीने मंगळवार दिनांक १ नोव्हेंबर रोजी भव्य मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी मोर्च्यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन राहुरी तालुका अध्यक्ष कॉ. राजेंद्र मुसमाडे यांनी केले आहे.
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात मुसमाडे यांनी म्हटले आहे की, अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचा हाती तोंडी आलेले पिकांचे डोळ्या देखत प्रचंड नुकसान झाले आहे . शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी त्वरित धोरण जाहीर करून ओला दुष्काळ जाहीर करावा व शेतकऱ्यांना सरसकट तातडीने प्रति एकरी ५० हजार रुपये मदत करावी . शेतीपंपाचे संपूर्ण विजबिल माफ करावे. दुग्ध उत्पादकांना दिलासा देण्यासाठी अनुदान देऊन दुधाचा दर वाढवावे यांसह विविध मागण्या साठी श्रमिक शेतकरी संघटनेच्या वतीने राहुरी तहसीलवर मंगळवार दिनांक १ नोव्हेंबर रोजी भव्य मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. तरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोर्च्यात मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन त्यांनी केले आहे.
मोर्च्यात कॉ. राजेंद्र बावके, कॉ. बाळासाहेब सुरुडे, कॉ. गुजाबा लकडे, कॉ. शरद संसारे, कॉ. जीवन सुरुडे, कॉ. मदिना शेख, कॉ.प्रकाश भांड , कॉ.आश्रू बर्डे अनिल बोरसे, नानासाहेब तारडे, रामेश्वर जाधव हे उपस्थित राहणार आहेत.