सोलापूरची जबाबदारी पुन्हा ‘मामां’कडे

0

इंदापूर – महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे आमदार दत्तात्रय भरणे हे सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून अनेक चांगल्या – वाईट चर्चेमध्ये सातत्याने राहिले; मात्र ज्या ठिकाणी आमदार दत्तात्रय भरणे काम करतात.
                  ते नागरिक, तो भाग कधीही भरणे यांना विसरू शकत नाही. तीच किमिया करत सोलापूरकरांच्या मनात आपला करिष्मा ठेवण्यात मामा यशस्वी ठरले आहेत. हीच बाब हूरून सोलापूर शहरातील व जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेस मजबूत करण्यासाठी पक्ष पातळीवरून आमदार दत्तात्रय भरणे यांना सूचना करण्यात आल्या आहेत. लागलीच भरणे यांनी सोलापुरात बैठका, कार्यक्रम यशस्वी सुरू केले आहेत.

राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांचे अत्यंत विश्‍वास म्हणून माजी मंत्री आमदार दत्तात्रय भरणे यांना ओळखले जाते. त्यामुळेच इंदापूर तालुक्‍यात न होणारा आमदारकीचा बदल तब्बल दोनदा झालेला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस महाविकास आघाडीमध्ये दाखल होत सरकारमध्ये असताना, पश्‍चिम महाराष्ट्रात सर्वात मोठी जबाबदारी आमदार दत्तात्रय भरणे यांना देत सहा ते सात महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी, राष्ट्रवादी कॉंग्रेसने आमदार भरणे यांना दिलेली होती. एकेकाळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचा बालेकिल्ला असलेला सोलापूर जिल्हा, आगामी काळात एकसंध करण्यासाठी, विरोधी पक्ष नेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे व पक्ष अध्यक्ष शरद पवार यांनी सोलापूरचे पालकमंत्री म्हणून दत्तात्रय भरणे यांना काम करण्यास संधी दिली.

सोलापूर शहरात व जिल्ह्याच्या ठिकाणी आजपर्यंत इतिहासात पालकमंत्र्याच्या माध्यमातून कधीही विकास झाला नव्हता, इतका विकास निधी, विकास कामे पालकमंत्री म्हणून दत्तात्रय भरणे यांनी केला. करोना प्रादूर्भाव कालावधीत राज्यातील पहिला पालकमंत्री करोनाग्रस्त पेशंट यांना रुग्णालयात भेटण्यासाठी गेला. पीपीई किट घालून येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांशी, रुग्णांशी संवाद साधणारे पालक मंत्री म्हणून राज्यभर दत्तात्रय भरणे चर्चेत आले. आठवड्यातून दोन ते तीन दिवस सोलापूर जिल्ह्याला वेळ देऊन विविध प्रश्‍न मार्गी लावणे, गटातटाचा विचार न करता सर्वांना राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष व इतर मित्र पक्षातील नेत्यांना एकत्र घेऊन दत्तात्रय भरणे यांनी आपल्या कामाची छाप पार्टीला वेगळी दाखवली.

राष्ट्रवादी कॉंग्रेसची जिल्ह्यातील व सोलापूर शहरातील विशेष बैठक माजी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली सोलापुरात नुकतीच पार पडली. तर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षपदी प्रमोद गायकवाड यांची निवड झाल्याबद्दल सन्मान सोहळा माजी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत पार पडला. त्यामुळे आगामी काळात इंदापूर तालुका सांभाळत सोलापूर जिल्ह्याची जबाबदारी माजी मंत्री आमदार दत्तात्रय भरणे पेलणार असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे.

राजकीय मशागत करणार
पालकमंत्री म्हणून काम करताना भाजप नेते व माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, माजी पालकमंत्री प्रा. लक्ष्मण ढोबळे व अन्य राजकीय विरोधी पक्षातील प्रमुखांना न दुखावता, अनेक विकासाचे विषय माजी मंत्री भरणे यांनी मार्गी लावले. राष्ट्रवादी कॉंग्रेसला मानणारा नवा वर्ग निर्माण झाला. इंदापूर तालुक्‍यातील पाणी योजने संदर्भात उजनीतून पाणी पळवण्याचा आरोप भरणे यांनी सोलापूर जिल्ह्यासाठी सहन केला. सोलापूर शहरातील दुसऱ्या पक्षातील अनेक नगरसेवक, जिल्हा परिषदेचे सदस्य, पंचायत समितीचे सदस्य व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे आकर्षले गेले. याची दखल पक्षाने घेतल्यानेच आगामी काळातील निवडणुकांसाठी माजी मंत्री भरणे यांना राजकीय मशागतीस धाडले आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here