जावळी तालुका आरपीआय आठवले गटाची भाजपा युतीला सोडचिठ्ठी !

0

सातारा/अनिल वीर : महायुतीत असतानाही विचारात घेतले जात नसल्याने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तथा आरपीआय (आठवले गट) यांनी जावळी तालुक्यात भाजपाला सोडचिठ्ठी दिली असल्याचे तालुकाध्यक्ष एकनाथ रोकडे यांनी सांगितले.

                       यासंबंधी जावळी तालुक्यातील आंबेडकर संघटनेचा एकमताने निर्णय झाला असून अनेकांनी खंत व्यक्त केली आहे. राज्यात व देशात रिपाईची युती भाजपाबरोबर असताना सातारा जिल्ह्यातील कुठल्याही स्थानिक स्वराज्य संस्था,पंचायत समिती,जिल्हा परिषद, नगरपालिका इत्यादी निवडणुकीत रिपाईला काही ठिकाणी राखीव जागा असतानासुद्धा एकही जागा देत नाहीत. साधे विचारातही घेतले जात नाही. नुकत्याच झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या निवडीत इतर महायुतीतील नवीन आलेल्या घटकपक्षाला जागा दिल्या.परंतु त्यामध्ये रिपाईचे जिल्हाध्यक्ष अशोकराव बापू गायकवाड यांना जाणीवपूर्वक डावलण्यात आले.शिवाय, तालुक्यातील कुठल्याही शासकीय कमिटीवर रिपाईच्या पदाधिकाऱ्यांना घेतले जात नाही. मागील लोकसभेच्या निवडणुकीत संपूर्ण देशातून फक्त सातारची जागा रिपाईला दिली असतानाही सातारा लोकसभा मतदारसंघात भाजपाने रिपाईला सहकार्य केले नाही.रिपाईचे एकमेव उमेदवार अशोकराव बापू गायकवाड यांना निवडणुकीत भाजपाने मतदान केले नाही.फक्त इतर मतदारसंघात रिपाईची दलित मते घेण्याचा व स्वतःची मते रिपाईला न देण्याचा अप्रत्यक्ष फॉर्मुला भाजपाने वापरल्याने संपूर्ण देशात मोदीची लाट असूनही सातारची मिळालेली ऐकमेव सीट रिपाईला गमवावी लागली होती.यावेळेस तर रिपाईला एकही जागा दिली नाही.आम्ही फक्त भाजपाला मतदान करण्यासाठी व त्यांनाच निवडून देण्यासाठी महायुती करायची का ? कुठल्याही साध्या मीटिंगला रिपाईला सन्मानपूर्वक निमंत्रण दिले जात नाही. महायुतीत राहून रिपाईला योग्य सन्मान व न्याय मिळणार नसेल व सत्तेत वाटा मिळणार नसेल तर  फक्त मतदानापुरते घटकपक्षाला गृहीत धरणार का ? असा खडा सवाल करण्यात आला आहे. असली युती काय कामाची ? प्रश्नावर बैठकीत सर्वांनी चर्चा केली.

       जाती धर्माच्या नावाने देशात निर्माण झालेली अराजकता, धुळीला मिळालेला शेतकरी, वंचित शोषित पीडित गरीब लोकांची झालेली वाताहात, पक्ष फोडाफोडीच्या राजकारणामुळे सामान्य माणसांच्या मनात सरकार विषयी निर्माण झालेली चीड व असंतोष, प्रचंड महागाई, मागासवर्गीय  विध्यार्थ्यांची बंद झालेली शिष्यवृत्ती, रसातळाला गेलेली देशाची अर्थव्यवस्था या सर्व गोष्टींना जबाबदार असलेले सरकार उपयोगाचे नाही.या सर्व गोष्टींचा विचार करून जावली तालुक्यातील तमाम रिपाईच्या भीमसैनिकांनी व पदाधिकाऱ्यांनी इथून पुढे भाजपाला कुठल्याही निवडणुकीत सहकार्य किंवा मतदान करायचे नाही.असा निर्णय सर्वानुमते मेढा येथील रिपाईच्या मीटिंगमध्ये घेण्यात आला.यापुढे जावली तालुक्यातील गावागावात जाऊन भाजपाच्या विरोधात मोर्चे बांधणी करणार असून जावलीतील दलित – आंबेडकरी संघटना आपले स्वतंत्र अस्तित्व दाखवेल.अशी ग्वाही रिपाईचे जावली तालुकाध्यक्ष एकनाथ रोकडे यांनी दिली. जावली तालुक्यात आंबेडकरी संघटनेकडे स्वतः निवडून येण्याएवढे मतदान नसले तरी कुणाला निवडून आणायचे व कुणाला पाडायचे ? एवढे निर्णायक मतदान मात्र नक्कीच आंबेडकरी संघटनेकडे आहे. त्यामुळे येणाऱ्या लोकसभा, विधानसभा, पंचायत समिती, जिल्हा परिषद आदी निवडणुकीत नक्कीच बघायला मिळेल.

          स्वाभिमानाने घटकपक्षाला सोबत घेणार नसाल तर इथून पुढे कोणाबरोबर घरोबा करायचा ?का आंबेडकरी,वंचित,मुस्लिम, ओबीसी  सामाजाला एक करून मत विभाजन न करता इंडिया आघाडीला सहकार्य करायचे. याचा सर्वस्वी निर्णय घेण्याचा अधिकार रिपाईचे जिल्हाध्यक्ष अशोकराव बापू गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली घेतला जाईल. अशीही माहिती एकनाथ रोकडे यांनी दिली.याप्रसंगी जावली तालुक्यातील तमाम आंबेडकरवादी कार्यकर्ते पदाधिकारी मिटींगला उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here