अधिकाऱ्यांना माजी मंत्री आ. थोरात यांच्या सूचना
संगमनेर : तालुक्यातील हंगेवाडी व उंबरी बाळापूर येथे जलजीवन मिशन योजने अंतर्गत पिण्याच्या पाण्याच्या योजनेचे काम सुरू आहे. मात्र राजकारणासाठी काही लोक या योजना बंद पाडण्याचे काम करत असून अधिकाऱ्यांनी त्यांच्या दबावाला बळी पडू नये. संगमनेर मधील विकास कामे बंद पाडण्याचे उद्योग काही लोक करत असून सत्ता येते आणि जाते, त्यामुळे अधिकाऱ्यांनी आपले काम प्रामाणिकपणे करून अशा लोकांच्या दबावाला बळी पडू नका अशा सूचना काँग्रेसचे वरिष्ठ नेते तथा राज्याचे माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी अधिकाऱ्यांना केल्या.
संगमनेर उपविभागीय कार्यालयात आयोजित टंचाई आढावा बैठकीत माजी मंत्री आमदार थोरात बोलत होते.यावेळी अकोलेचे आमदार डॉ. किरण लहामटे, नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे, उपविभागीय अधिकारी शशिकांत मंगरूळे, माजी सभापती सौ.सुनंदाताई जोर्वेकर, माजी उपसभापती नवनाथ अरगडे, जि.प.सदस्य अजय फटांगरे, सौ.मिराताई शेटे, रामहरी कातोरे, मिलिंद कानवडे, जिल्हा बॅकेचे संचालक गणपतराव सांगळे, पंचायत समिती सदस्य किरण मिंडे, विष्णुपंत रहाटळ,बी.आर.चकोर, सुभाष सांगळे, उपविभागीय कृषी अधिकारी गोविंद कुलाळ, तालुका कृषी अधिकारी प्रवीण गोसावी, गटविकास अधिकारी अनिल नागणे,प्रभारी तहसीलदार गणेश तळेकर, शितल घावटे, नायब तहसीलदार श्रीकांत लोमटे, डॉ. सुरेश घोलप आदिंसह सर्व विभागाचे प्रशासकीय अधिकारी यावेळी उपस्थित होते.
आमदार थोरात यावेळी म्हणाले की, चालू वर्षी अलनिनोच्या प्रभावामुळे उशिरा येणारा पाऊस आणि कमी पाऊस या बाबी लक्षात घेऊन प्रशासनाने सतर्क राहिले पाहिजे ज्या गावात रोजगार हमी योजनेच्या कामाची मागणी येईल त्यांना रोजगार हमीचे काम व मागणीनंतर तातडीने पिण्याच्या पाण्याचे टँकर उपलब्ध करून द्यावेत.तालुका विस्ताराने मोठा असून सर्व ग्रामसेवक व तलाठी यांनी गावच्या समस्यांवर लक्ष ठेवले पाहिजे. हा अडचणीचा काळ असून ३० जुलै पर्यंतचे पिण्याच्या पाण्याचे, रोजगार हमीच्या कामाचे व चाऱ्याचे नियोजन करा.जलजीवन व जीवन प्राधिकरणच्या योजनांची कामे ज्या ठिकाणी सुरू आहेत. ती बंद होता कामा नये. नळ योजना दुरुस्त करून घ्या. पिण्याचे पाणी, रोजगार हमीची कामे आणि चारा याबाबत प्रशासनाने अधिक सतर्क राहावे असे सांगताना अधिकाऱ्यांनी मंजूर झालेली सर्व कामे अधिक चांगले होण्यासाठी काम करा. कुणाच्याही राजकीय दबावाला बळी पडू नका अशा सूचनाही आमदार थोरात यांनी यावेळी दिल्या.
अकोल्याचे आमदार डॉ.किरण लहामटे म्हणाले की, जलजीवन व जीवन प्राधिकरणाची कामे चांगली झाली तर आगामी काळामध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या येणार नाही. आमदार बाळासाहेब थोरात व महाविकास आघाडीने अत्यंत चांगल्या योजना राबवल्या असून त्याची माहिती लोकांपर्यंत पोहोचवा. लोकांच्या तक्रारी येणार नाही यासाठी अधिकाऱ्यांनी काम केले पाहिजे असेही त्यांनी सांगितले.यावेळी जिल्हा परिषद सदस्य रामहरी कातोरे , मिराताई शेटे, अजय फटांगरे, गणपतराव सांगळे यांनी आपल्या भागातील विविध प्रश्न उपस्थित केले. या आढावा बैठकीला टंचाई बाबत जाहीर केलेल्या गावातील सरपंच ,ग्रामसेवक, तलाठी ,कृषी अधिकारी यांसह शासकीय विभागांचे विविध अधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक गटविकास अधिकारी अनिल नागणे यांनी केले तर नायब तहसीलदार लोमटे यांनी आभार मानले.