संगमनेर : प्रधानमंत्री आवास योजनेच्या घरकुलाच्या पहिल्या हप्त्याचा धनादेश देण्यासाठी १७ हजाराची लाचेची मागणी करणारा अभियंता विकास सुरेश जोंधळे (वय २५, कोकणगाव, ता.संगमनेर) याला नाशिकच्या लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.
बुधवार दि.३ मे रोजी सायंकाळी शहरातील मोगलपुरा येथे नाशिक एसीबीचे निरीक्षक संदीप साळूंखे, हवालदार पंकज पळशीकर, पोलिस नाईक प्रकाश महाजन, परशुराम जाधव यांच्या पथकाने सापळा रचून ही कारवाई केली. विकास जोंधळे हा ठेकेदाराकडून नियुक्त असलेला अभियंता आहे. बुधवारी रात्री उशिरा पर्यंत विकास जोंधळे याची संगमनेरच्या शासकीय विश्रामगृहात एसीबीच्या पथकाकडून चौकशी सुरु होती. याप्रकरणी बुधवारी रात्री दोन वाजता शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदाराने जोंधळे विरोधात दोन दिवसापूर्वी नाशिकच्या लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली होती. शहरातील मोगलपुरा येथील तांदळाच्या दुकानात लाच घेताना तो लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अलगद अडकला. दरम्यान लाचखोर अभियंता विकास सुरेश जोंधळे याला काल गुरुवारी न्यायालयापुढे हजर केले असता न्यायालयाने त्याला दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे