संगमनेर : घराच्या पाठीमागे खेळत असताना अचानक आलेल्या तुरळक पाऊस आणि वादळी वाऱ्याने वीज वाहक तार अंगावर पडल्याने विजेचा जोरदार धक्का बसून सात वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. सदरची घटना तालुक्यातील चंदनापुरी येथे काल गुरुवारी दुपारी घडली.
याबाबत समजलेली माहिती अशी की, तालुक्यातील वेल्हाळे येथील गोकुळ मेंगाळ हे चंदनापुरी येथील माधव शंकर राहाणे यांची शेती वाट्याने करतात. काल गुरुवारी दुपारी दीड ते दोन वाजेच्या सुमारास गोकुळ मेंगाळ यांचा सात वर्षाचा चिमुकला अजित गोकुळ मेंगाळ हा राहाणे यांच्या घराच्या पाठीमागील बाजूस खेळत होता, यावेळी तुरळक पाऊस आणि त्यासोबत आलेल्या जोरदार वादळी वाऱ्यामुळे वीज वितरण कंपनीची वीज वाहक तार तुटून ती खेळत असलेल्या अजित मेंगाळ या चिमुकल्यावर पडली. समोरची घटना दृष्टीस पडताच उपस्थित लोकांनी जोरजोरात आरडा ओरडा केल्यावर घटनास्थळी लोकांनी गर्दी केली मात्र वीज वाहक तारेतून वीज प्रवाह सुरू असल्याने उपस्थितांचा नाईलाज झाला. त्यानंतर दुर्घटनेची माहिती स्थानिक वायरमन गोकुळ कतारी,मनोज नेहे यांना समजल्यावर त्यांनी ही वीज वाहक तार आलेल्या ट्रांसफार्मरकडे धाव घेत ट्रांसफार्मर मधून सुरू असणारा वीज प्रवाह खंडित केला मात्र याला वेळ गेल्याने अजित मेंगाळ या चिमुकल्याचा विजेचा जोरदार धक्का बसल्याने जागेवरच मृत्यू झाला होता. त्याला औषधोपचारासाठी घुलेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले मात्र औषधोपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्या असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. सदरच्या घटनेने चंदनापुरी आणि वेल्हाळे परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.