गणेशच्या निवडणुकीपासून सभासद शेतकऱ्यांना वंचित ठेवण्याचा सत्ताधारी आणि प्रशासनाचा डाव

0

राहता :  गणेश सहकारी साखर कारखान्याच्या येऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये आपले कृष्णकृत्य उघडे पडू नये म्हणून विरोधक-सभासद शेतकऱ्यांना निवडणुकीपासूनच वंचित ठेवण्याचा प्रयत्न सत्ताधारी करीत आहे आणि त्यांना प्रशासनही मदत करीत असल्याचा आरोप सभासद शेतकऱ्यांनी केला आहे.                                                                                                                          
          गणेश सहकारी कारखान्याची प्रलंबित असलेली निवडून जाहीर झाल्यापासून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्या आहेत. सध्या कारखान्यावर २०१६ पासून महसूल मंत्री विखे पाटील प्रणित संचालक मंडळाची सत्ता आहे . त्याचप्रमाणे पदमश्री विठ्ठलराव विखे पाटील कारखान्याने गणेश कारखाना चालविण्यास घेतला आहे. यादरम्यान लागलेल्या निवडणुकीमध्ये विखे विरुद्ध थोरात -कोल्हे – शेतकरी संघटना तसेच इतरही शेतकरी सभासद उभे ठाकले आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून कारखाना व्यवस्थापन विखे प्रणित संचालक मंडळाकडे आहे. या व्यवस्थापनावर कारखाना तोट्यात घालण्यास जबाबदार धरत आहे.  तसेच गैरकारभाराचाही आरोप विरोधक उघडपणे करीत आहे.                                 काल विरोधक शेतकऱ्यांनी कारखाना कार्यस्थळावर उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मोठी गर्दी केली होती.  मात्र शेतकऱ्यांना अर्ज भरण्यास अनेक अडचणी प्रशासनाकडून उभ्या करण्यात येत असल्याचा आरोप उपस्थित शेतकऱ्यांनी केला आहे. याबाबत प्रतिक्रिया देताना गणेश कारखान्याचे माजी उपाध्यक्ष शिवाजी कार्ले म्हणाले की गणेश साखर कारखाना हा आमच्या परिसरातील कामधेनू आहे . या परिसराची संपूर्ण अर्थव्यवस्था या कारखान्यावर अवलंबून आहे.   मात्र सत्ताधाऱ्यांनी ही कामधेनू अक्षरशः विक्रीला काढली आहे. कारखाण्यासोबत येथील ऊस उत्पादक शेतकरीही कसा कर्जबाजारी होईल यासाठी काहींचा प्रयत्न राहिला आहे. आणि तो हणून पाडण्यासाठीच आणि सत्ताधाऱ्यांचा ऊतमात रोखण्यासाठी आम्ही सर्व शेतकरी एकवटले आहोत . यापूर्वी आम्ही निवडणूक न घेता एकमताने कारखाना सत्ताधाऱ्यांच्या ताब्यात दिला होता  मात्र त्यांनी कारखान्याची पुरती वाट लावली आहे. म्ह्णून आम्ही त्यास पायबंध घालण्यासाठी निवडणुकीला उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे.   येथील यंत्रणा पूर्णपणे प्रवरेच्या तालावर नाचत असून विरोधकांचे  उमेदवारी अर्ज कसे दाखल होणार नाही आणि निवडणूक कशी टाळता येईल यासाठी प्रयत्न करीत आहे.  प्रशासनाकडून अनेक अडचणी उभ्या केल्या जात आहे. जसे मागील पाच वर्षांपैकी किमान तीन वर्षे ऊस पुरवठा करणे . शेअर रक्कम किती असावी याची संपूर्ण माहिती न देणे. सूचक अनुमोदकांसाठी काय नियम आहे याबाबत माहिती मिळावी म्हणून विनंती अर्ज करूनही  अर्ज भरण्याची मुदत अगदी संपत आली तरीही प्रशासनाकडून माहिती दिली जात नाही . निवडणूक असूनही अधिकारी जागेवर थांबत नाही , टोलवाटोलवीचे उत्तरे देतात .उपविभागीय  अधिकारी व निवडणूक निर्णय अधिकारी माणिकराव आहेर यांच्याकडे तक्रार केली . त्यांनी आदेश देऊनही येथील अधिकारी दाद देत नाही . अर्ज भरायला अवघे दोन दिवस शिल्लक असतानाही अधिकारी गायब राहतात .  याचाच अर्थ शेतकऱ्यांनी दाखल केलेले अर्ज अपूर्ण दाखवून छाननी मध्ये अपात्र ठरविण्याचा डाव सत्ताधाऱ्यांचा आहे . मात्र प्रशासनाच्या असहकार्यामुळे शेतकऱ्यांचे अर्ज बाद ठरल्यास संबंधित अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्यात येईल . तसेच यामुळे शेतकऱ्यांचा असंतोष अधिक उफाळून येणार आहे. शिवाय सत्ताधाऱ्यांनी अडवण्याचे कितीही प्रयत्न केले तरी आम्ही सक्षम विरोधी पॅनल उभे करणारच असा विश्वास  कार्ले यांनी व्यक्त केला आहे. तसेच येणाऱ्या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना खाली खेचू असा विश्वासही व्यक्त केला आहे. यावेळी गणेश कारखान्याचे माजी उपाध्यक्ष शिवाजीराव लहारे,भाजपचे राहत्याचे माजी तालुकाध्यक्ष राजेंद्र लहारे ,डॉ. एकनाथ गोंदकर ,विठ्ठलराव गोरे, भीमराज  रकटे,सुभाष पाडांगळे,रवी लहारे ,उत्तमराव मते ,विलास वाघ ,विठ्ठलराव शेळके ,अक्षय गोर्डे ,अमोल शेळके ,अण्णा वाघे ,सुधीर लहारे आदींसह मोठ्या संख्येने शेतकरी कारखाना स्थळावर जमा झाले होते . 

चौकट- याबाबत कारखान्याच्या प्रशासनाची भूमिका जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता कारखान्याचे कार्यकारी संचालक शेतकऱ्यांनी आरोप केल्या प्रमाणे कारखाना कार्यस्थळावर गैरहजर असल्याचे आढळून आले . तर कारखान्याचे सेक्रेटरी भोसले यांनी सांगितले की सभासदांची कोणतीही अडवणूक केली जात नसून त्यांचे काही गैरसमज झाले असू शकतात .आम्ही शेतकऱ्यांना मागणी प्रमाणे माहिती देण्याचा प्रयत्न करीत आहोत मात्र शेतकऱ्यांनी नियमाप्रमाणेच अर्जासोबत दस्तऐवज जोडावे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here