अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचं निवासस्थान असलेल्या व्हाईट हाऊसचं सुरक्षा कवच भेदून कथितरित्या ट्रक आतमध्ये घुसवण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. सोमवारी (22 मे) रात्रीच्या सुमारास हा प्रकार घडला.
साई वर्शिष्ठ कंदुला असं संशयित ड्रायव्हरचं नाव असून तो 19 वर्षांचा आहे. साई कंदुला हा अमेरिकेतील चेस्टरफिल्ड येथील सेंट लुईस गावचा रहिवासी आहे. आपल्या जबाबात त्याने राष्ट्राध्यक्ष जो बायडन आणि उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरीस यांना जीवे मारण्याची धमकी दिली, असं पोलिसांनी म्हटलं आहे.साईवर विविध प्रकारचे गंभीर आरोप लावण्यात आले आहेत.
अमेरिकेच्या सिक्रेट सर्व्हिसमधील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात कोणीही जखमी झालेले नाही. पण तरीही या प्रकरणाची कसून चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. साईला मंगळवारी (23 मे) डीसी सुपिरिअर कोर्टात हजर करण्यात आलं. यावेळी त्याच्या वकिलाने साईविरुद्ध कोणताही पुरावा नसल्याचा बचाव न्यायाधीशांसमोर केला. पण हा युक्तिवाद फेटाळून लावताना न्यायाधीशांनी त्याचा समाजाला धोका असल्याचं मत व्यक्त केलं. आता हे प्रकरण फेडरल कोर्टाकडे हस्तांतरित होण्याची शक्यता आहे.
कंदुलावर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात त्याच्यावर धोकादायक हत्याराने हल्ला, बेदरकारपणे वाहन चालवणे, जीवे मारण्याचा प्रयत्न तसंच राष्ट्राध्यक्ष आणि उपराष्ट्राध्यक्ष तसंच त्यांच्या कुटुंबीयांना हानी पोहोचवण्याचा प्रयत्न करणे, तसंच देशाच्या संपत्तीचं नुकसान अशा प्रकारची कलमे लावण्यात आली आहेत.
पोलिस दलाने दिलेल्या माहितीनुसार, साई कंदुला हा अमेरिकेचा नागरीक आहे. पण हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार नाही. साई कंदुलाने मिसोरी प्रांतातील चेस्टरफिल्डमधील मॉरक्वेट हायस्कूलमधून शिक्षण घेतल्याचं त्याच्या शाळेने मान्य केलं.
साई चालवत असलेल्या वाहनात कोणत्याही प्रकारची धोकादायक शस्त्रे किंवा स्फोटके आढळून आली नाहीत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. पण ट्रकमध्ये नाझी झेंडा तसंच काळी बॅग आढळून आली, असंही त्यांनी सांगितलं. पोलीस ट्रकची तपासणी करताना लाल झेंडा वाहनाजवळ पडल्याचे फोटो रॉयटर्स वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केले आहेत. स्थानिक प्रमाणवेळेनुसार रात्री दहा वाजता ही संपूर्ण घटना घडली. यानंतर आसपासच्या परिसरात झाडाझडतीही घेण्यात आली.