“रॅगिंग ही एक मानसिक विकृती” – प्रा.वैशाली सुपेकर

0

कोपरगाव- “माणूस हाही एक प्राणी असला तरी प्रकृतीला संस्कृतीचे रुप देऊन माणसाने आपले वेगळेपण सिद्ध केले आहे. या संस्कृतीचा भाग म्हणजे स्वतःबरोबरच इतरांना आनंद देण्यासाठी माणसाने निर्माण केलेले सण -उत्सव होत. असे असतानाही मूळ पशुवृत्ती नाहीशी न झाल्याने विघातक पद्धतीने आनंद मिळविण्याची वृत्ती समाजातील काही व्यक्तींमध्ये दिसून येते. अशा व्यक्तींकडूनच ‘रॅगिंग’ म्हणजे इतरांचा छळ करण्याची कृती घडते. ही कृती मानसिक विकृतीचे लक्षण आहे.” असे वैशाली सुपेकर यांनी सांगितले.

     येथील एस. एस. जी. एम. कॉलेजमध्ये शासन निर्देशानुसार १२ ते १८ ऑगस्ट २०२३ या कालावधीत ‘अँटी रॅगिंग जागृती सप्ताहाचे’ आयोजन करण्यात आलेले आहे.या सप्ताहाच्या  प्रारंभीच्या व्याख्यानसत्रात प्रमुख वक्त्या म्हणून डॉ. सुपेकर बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. रमेश सानप हे होते.

     व्याख्यानात रॅगिंगविषयी विचार मांडताना डॉ. सुपेकर यांनी ‘रॅगिंग’ या संकल्पनेचे विविध पैलू उलगडून दाखविण्याबरोबरच रॅगिंग प्रतिबंधक अधिनियमाची सुरुवात कशी व कधी झाली? या अधिनियमानुसार रॅगिंग या संकल्पनेत गुन्हेगार, सहकारी ,साक्षीदार, प्रेरक या सर्वांसाठीच शिक्षेची कशी व कोणती तरतूद आहे? त्या विषयी राज्य शासनाने कोणते परिपत्रक जारी केलेले आहे ?  यासंबंधाने विस्तृत व साधार माहिती दिली. अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ.सानप यांनी सुशिक्षित व सुसंस्कृत यातील फरक स्पष्ट करून, विद्यार्थी दशेत चांगले,- वाईट लक्षात येत नाही. म्हणून विद्यार्थ्यांना प्रबोधन  करणे गरजेचे असते, असे सांगून रॅगिंग व महाविद्यालयाकडून त्यासंबंधी असलेल्या शिक्षेच्या तरतुदी याविषयी मार्गदर्शन केले.

        सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिमखाना प्रमुख डॉ. विशाल पवार यांनी केले ;तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.सीमा चव्हाण यांनी केले. उपस्थितांप्रति डॉ. माधव यशवंत यांनी आभार व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाच्या कला विभागाचे उपप्राचार्य डॉ. सुभाष रणधीर, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.आर.एम. गमे यांच्यासह प्राध्यापक व विद्यार्थी  मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here