नेत्रदान पंधरवड्यानिमित्त महिला दुचाकी रॅलीचे आयोजन
सातारा दि.26 : नेत्रदान पंधरवड्यानिमित्त स्व. क्रांतिसिंह नाना पाटील सर्व साधारण रुग्णालय व इनरव्हील क्लब ऑफ सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने अवयव दान जनजागृतीसाठी महिला दुचाकी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीला जिल्हा शल्यचिकित्स डॉ. युवराज करपे यांनी हिरवा झेंडा दाखवून मार्गस्त केले.
यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्यिचिकित्सक डॉ. राहूल जाधव, जिल्हा नेत्र शल्यचिकित्सक डॉ. चंद्रकांत काटकर, क्लबच्या अध्यक्ष निना महाजन यांच्यासह रुग्णालयातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
अवयव दान ही लोक चळवळ झाली पाहिजे, असे सांगून डॉ. करपे म्हणाले, अवयव दानासाठी नागरिकांनी पुढे यावे. एका व्यक्तीने नेत्र दान केले तर दोन अंध व्यक्तींना दृष्टी मिळू शकते. ज्या प्रमाणात अंध व्यक्तींची संख्या आहे त्या प्रमाणात नेत्र उपलब्ध होत नाही. मृत व्यक्तीने जर नेत्र दानाची नोंद केली नसेल तर त्यांच्या नातेवाईकांच्या संमतीनेही नेत्र दान करता येते. यासाठी जिल्हा रुग्णालयाशी संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी केले. ही महिला दुचाकी रॅली स्व. क्रांतिसिंह नाना पाटील रुग्णालय, मोती चौक अशी जावून पोवई नाका येथे या रॅलीची सांगता करण्यात आली.