कॅनॉल कोरडे अन् पिके तहानलेली

0

भिलार : मॉन्सूनने यावर्षी पुरेसा पाऊस पडला नसल्याने खरिपाच्या हंगामानंतर रब्बीची पेरणी झाली. सध्या रब्बीची पिके शिवारात डोलत असून, पाण्याअभावी करपू लागल्याचे चित्र दिसत आहे. यातच धोमच्या उजव्या कॅनॉलला मागील पाणी येऊन आज एक महिना पूर्ण होत आला आहे. सध्या शेत शिवारात रब्बीतील ज्वारी, कांदा, गहू, हरभरा आदी पिके जोमात आली असून, त्यांना पाण्याची नितांत गरज आहे.

धोम पाटबंधारे विभागाने या परिस्थितीचा विचार करून लवकरात लवकर धोमच्या उजव्या कॅनॉलला पाणी सोडावे, अशी मागणी कुडाळ पंचक्रोशीतील शेतकऱ्यांकडून होत आहे. जावळी तालुक्यात यावर्षी पावसाने दडी मारल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. डोंगर उतारावरील भागात डिसेंबरमध्येच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होऊ लागला आहे.

या वर्षी कमी पर्जन्यमान असल्याने दुष्काळसदृश परिस्थिती असल्याने रब्बी हंगामातील पिके हातातून निघून जातील, अशी स्थिती उद्भवली आहे. ओढे नाले आठले आहेत, तर पाझर तलावानी तळ गाठला आहे. म्हणून महू धरणाचे पाणी कालव्याच्या माध्यमातून उपलब्ध व्हावे. ही अपेक्षा आहे.
– अविनाश दिवडे, शेतकरी म्हसवे, ता. जावळी

आधीच मरकट… यात मद्य प्‍याला…

महू, हातगेघर धरणे असूनही धरणाची कामे आजही प्रलंबित आहेत. यामुळे धरण उशाला अन् कोरड घशाला अशी काहीशी अवस्था पाहायला मिळत आहे. कुडाळ पंचक्रोशीतील शेतकरी व नागरिकांना धोम कालव्याच्या पाण्याचा आधार आहे. आज मागील पाणी येऊन महिना झाले, तरी अजूनही कालव्याला पाणी नाही. यातच चार ते पाच दिवसांपूर्वी धोम धरणाचा डावा कालवा ओझर्डे येथे फुटून लाखो लिटर पाणी वाया गेले. यामुळे आधीच मरकट यात मद्य प्याला, अशी अवस्था पाटबंधारे विभागाची झाली.

पिण्‍याच्‍या पाण्‍याचा प्रश्‍‍न…

सध्या उन्हाचा तडाखा वाढत असल्याने जमिनीतील ओल कमी होत चालली आहे.उजव्या कालव्याला पाणी सोडले गेले नाही, तर शेतकऱ्यांचे पिकांसोबत आर्थिक नुकसानही होणार आहे, तसेच काही गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उद्भवू लागला आहे. याकरिता तत्काळ कॅनॉलला पाणी सोडले गेले, तर काही गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here