पालिका प्रशासनाचा सावळा गोंधळ
कोपरगाव (प्रतिनिधी):-
कोपरगांव नगरपालिकेने लक्ष्मीनगर भागा जवळ स्वामी समर्थ नगर येथे अंदाजे २० ते २२ लाख रुपये खर्च करून स्व. सूर्यभानजी वहाडणे सांस्कृतिक सभागृह बांधण्यात आले आहे. या सभागृहाला मोठ मोठ्या संरक्षण भिंती सुद्धा उभारल्या आहेत . पालिकेने सभागृहा साठी निधी उपलब्ध करून जवळ पास अंदाजे २० ते २२ लाख रुपये खर्च केले परंतु सध्या गेल्या ३ वर्षापासून सदरचे सभागृह हे ओस पडले आहे . देखभाली अभावी या सभागृहाला स्मशानकळा आली आहे. या ठिकाणच्या परिसरात घाणीचे ,गवताचे व काट्यांचे साम्राज्य निर्माण झालेले दिसत आहे.
संरक्षण भीतीसह सभागृहाच्या काही ठिकाणी पडझड झाल्याचे दिसत आहे. त्याच बरोबर रात्रीच्या वेळेस त्याच सांस्कृतिक भवनात तळीरामांचा व डुकरांचा रहिवास होत असल्याचे चित्र दिसत आहे. पालिकेने सभागृह सर्वसामान्य नागरिकांसाठी उभारला की, डुकरांसाठी उभारला हा प्रश्न स्थानिक नागरिकांना पडला आहे. सदरचे सभागृह हे पालिकेने कुणाकडे हस्तांतर केले आहे, कोणत्या निधी अंतर्गत काम पूर्ण केले गेले आहे. काम पूर्ण झाले आहे की, नाही याचा देखील खुलासा अद्याप झाला नसून याची माहिती देखील सर्व सामान्य नागरिकांना पालिके मार्फत जाहीर करण्यात आले नसून या सभागृहाच्या दुरवस्थेला नक्की जबाबदार कोण ? असा सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. जनतेच्या करातून एवढा खर्च करून पालिका प्रशासन याकडे बघायची भूमिका किती दिवस घेणार…. (क्रमशः)
