एस. एस. जी. एम. कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी व्यक्त केली सावित्रीबाईंविषयीची कृतज्ञता…..

0

कोपरगाव- येथील रयत शिक्षण संस्थेच्या एस. एस. जी. एम. कॉलेजमध्ये मराठी विभाग व महिला कल्याण समिती यांच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात अनेक विद्यार्थ्यांनी उस्फूर्तपणे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे कार्य व विचारांविषयी आपली मनोगते तसेच कविता सादर केल्या. काळे स्नेहल, साक्षी सवाई, पूजा खटकाळे, अभिजीत बाविस्कर, सानिया पांगरकर, नीलम मगर, दवंगे मोहिनी  साक्षी सुरासे, अंजली पगारे  अर्चना शिंदे….. इत्यादी विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचे स्मरण करून आजच्या काळातील  त्याचे महत्त्व पटविणारे विचार मांडले. तर ऋतुजा मोहिते, अर्पिता नांगरे ,अंजली अल्हाट ,विकी पगारे, अर्चना शिंदे…. या विद्यार्थ्यांनी व प्रा.सुनीता अत्रे ,प्रा.सुशीला ठाणगे यांनी काव्यातून सावित्रीबाईं विषयीच्या भावना व्यक्त केल्या. या सर्व विद्यार्थ्यांच्या  सादरीकरणातून  मनोमन भरून राहिलेला सावित्रीबाई विषयीचा कृतज्ञता भावच व्यक्त झाला.

सदर कार्यक्रमाचे अध्यक्षपद महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ .आर. आर. सानप यांनी भूषविले तर वाणिज्य विभागाचे उपप्राचार्य डॉ. अर्जुन भागवत यांची विशेष उपस्थिती लाभली. डॉ.भागवत यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनातील ठळक प्रसंग सांगून त्यांच्या स्वभावाचे वेगळे पैलू  दाखविण्याबरोबरच सामाजिक कार्याचे महत्त्व अधोरेखित केले. याबरोबरच भागवत यांनी सावित्रीबाईंचे विचार अनुसरतांनाच आज विद्यार्थ्यांनी कसे वागावे, कोणत्या गोष्टी टाळाव्या याविषयी मार्गदर्शन सूचना केल्या.

अध्यक्षीय भाष्य करताना डॉ .सानप यांनी म.फुले दांपत्याच्या कार्याशी असलेला कर्मवीरांचा अनुबंध दाखवून  या थोर विभूती तींच्या कार्यामुळे स्त्री जीवनाचे चित्र कसे बदलले ते स्पष्ट केले. हे स्पष्ट करताना इंदिरा गांधी, मार्गा रेट थॅचर, शेख हसीना, द्रौपदी मुर्मू इत्यादी कर्तृत्ववान स्त्रियांची उदाहरणे देऊन, पूर्वी गावात जेवढी सुविधा तेवढेच स्त्रीला शिक्षण मिळत असे. आज मात्र शिक्षणात स्त्रियांचाच वाटा मोठा असल्याचे दाखवून दिले.

मराठी विभाग व स्त्री सबलीकरण समिती प्रमुख प्रा. उज्ज्वला भोर यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रम घेण्यामागील भूमिका स्पष्ट केली. तर राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ .वैशाली सुपेकर यांनी सहभागी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून सर्वांचे आभार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.देवकाते व डॉ.सीमा चव्हाण यांनी केले. सदर कार्यक्रमाला सर्व विभाग प्रमुख, प्राध्यापक व वरिष्ठ व कनिष्ठ विभागातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here