पतसंस्था प्रशासकाच्या जाचाला कंटाळून कर्जदाराची आत्महत्या …

0

देवळाली प्रवरा / प्रतिनिधी, 

               राहुरी तालुक्यातील एका पतसंस्थेवर असलेल्या प्रशासकाच्या जाचाला कंटाळून राहुरी तालूक्यातील टाकळीमियाॅ येथील सुभाष मघाजी चोथे, वय ५५ वर्षे या कर्जदाराने काल रात्रीच्या दरम्यान गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी मयताच्या नातेवाईकांनी केली. 

          सुभाष मघाजी चोथे, वय ५५ वर्षे, रा. चोथे वस्ती, टाकळीमियाॅ, राहुरी. हे काल दिनांक ९ एप्रिल २०२४ रोजी रात्री १०.३० वाजे दरम्यान बाहेर जाऊन येतो असे सांगुन घरातुन बाहेर पडले होते. आज दि.१० एप्रिल २०२४ रोजी सकाळी ७.३० वाजे दरम्यान हे त्यांच्या घरापासून जवळच असलेल्या एका शेतातील आंब्याच्या झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आले. त्यांना तातडीने राहुरी येथील ग्रामीण रुग्णालय नेण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून उपचारा पूर्वीच मयत घोषित केले. 

       या घटने बाबत मयत सुभाष चोथे यांचे भाऊ बाळासाहेब चोथे यांनी सांगीतले कि, सुभाष चोथे यांनी राहुरी येथील राजमाता जिजाऊ पतसंस्था या संस्थेकडून कर्ज घेतले होते. ते कर्ज परत भरण्यासाठी वसुली अधिकारी व प्रशासक यांनी सुभाष चोथे यांच्याकडे अनेक वेळा तगादा लावला होता. सुभाष चोथे यांनी सुमारे एक वर्षापूर्वी त्यांचे २ लाख ३५ हजार रुपये कर्ज भरले. सदर कर्ज भरेपर्यंत वसुली अधिकारी व प्रशासक किरण देशमुख व निकम या अधिकाऱ्यांनी तुम्ही कर्ज भरल्या नंतर तुम्हाला संस्थेचा निल दाखला दिला जाईल, असे आश्वासन दिले होते. मात्र कर्ज भरून घेतल्या नंतर याच अधिकाऱ्यांनी तुम्ही दुसऱ्या कर्जदाराला जामीन आहे, त्या कर्जदाराचे पण कर्ज भरा. त्यावेळी तुम्हाला नील दाखला देण्यात येईल, असे अधिकाऱ्याने सांगीतले. सुभाष चोथे यांनी वेळो वेळी अधिकाऱ्यांकडे नील दाखला मिळण्यासाठी विनवणी केली. तरीपण अधिकाऱ्यांनी त्यांना निल दाखला दिला नाही. कर्ज भरुन देखील पतसंस्थेकडून निल दाखला मिळत नसल्याने सुभाष चोथे हे गेल्या काही दिवसांपासून चिंतेत राहत होते. या बाबत त्यांनी नातेवाईकांना देखील सांगीतले होते. राजमाता जिजाऊ पतसंस्थेवर प्रशासक म्हणून असलेले किरण देशमुख व निकम या अधिकाऱ्यांच्या जाचास कंटाळून सुभाष चोथे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात यावा. अशी मागणी मयत सुभाष चोथे यांचे भाऊ बाळासाहेब चोथे यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here