मावळ : मावळ तालुक्यामध्ये ग्रामीण भागात शेतीला जोडधंदा म्हणून शेतकरी गाई, म्हशी, शेळी अथवा इतर पाळीव जनावरांचे पालनपोषण करतो. गाई – म्हशी यांच्यापासून मिळणाऱ्या दुधाच्या व्यवसायावर शेतकरी आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहेत.
मावळातील मोठ्या संख्येने शेतकरी दुग्ध व्यवसाय करतात. मात्र अलीकडच्या काळात चाऱ्याची टंचाई झाली असून पशूखाद्य देखील महागल्याने पशूपालक शेतकरी अडचणीत आला आहे.
गायी, म्हशी यांच्यासाठी लागणारे चारा, खाद्य महागले असून सोबत गायी, म्हशी यांच्या किमती देखील वाढल्या आहेत. त्यातही म्हशीच्या किमती लाखोच्या घरात गेल्याने शेतकऱ्यांसाठी दुग्ध व्यवसाय करणे कठीण होऊ लागले आहे. त्याच दुधाला मनासारखा भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी होत आहे.
दिवाळीचा सण आता अवघ्या एक दोन दिवसांवर येवून ठेपला आहे. दुधाचे चार पैसे हातात मिळतील आणि सण आनंदात जाइल, अशी शेतकऱ्यांची आशा होती. निवडणूकीचे वर्ष असल्याने दुधाला चांगला भाव मिळणार, असे शेतकऱ्यांना वाटत होते.
परंतु दुधाचा दर ३५ ते ४० रुपये प्रतिलिटरच्या घरातच राहिला. मावळात काही दुध डेअऱ्यांवर दुधाला फॅटनुसार (दुधाच्या दर्जानुसार) ५५ ते ६० रुपये लिटरचा दर मिळत आहे. परंतु शेतकऱ्यांसाठी हा दर तसा परवडणारा नाही. कारण पशूपालकांना ज्या प्रमाणात खर्चा करावा लागतो, त्याप्रमाणात दुधाचे पैसे मिळत नाहीत.
चारा आणखीन महागणार
मावळ तालुक्यात गाई, म्हशी आणि बैल आदी जनावरांसाठी महत्वाचे खाद्य म्हणजे वैरण अर्थात भाताच्या पेंढ्या. परंतु यंदा परतीच्या पावसाने भात पिकाचे नुकसान केल्याने चाऱ्याची टंचाई निर्माण होऊन वैरण महाग होण्याची चिन्हे दिसत आहेत.
म्हशीच्या किंमती लाखाच्या घरात
चांगल्यात चांगली म्हैस ही पूर्वी पन्नास ते साठ हजार रुपये पर्यंत मिळत होती. परंतु आता म्हशीच्या किंमती ७० ते ८० हजारांच्या घरात गेल्या आहेत. तर काही म्हशी लाख लाख रुपये दिल्याशिवाय शेतकरी सोडत नाही. एकीकडे म्हशीच्या किमती वाढल्या आहेत, तर दुसरीकडे खाद्य महागल्याने शेतकऱ्यांना दुग्ध व्यवसाय करणे कठीण होऊन बसले आहे.
व्यावसायिक कमावताहेत नफा
कष्ट आणि खर्च पाहता दुधाचे चांगले पैसे हे शेतकऱ्यांच्या हातात पडले पाहिजेत. परंतु खरा नफा हा दुग्ध विक्री करणारे व्यावसायिक कमावताना दिसतात. हे व्यावसायिक थेट शेतकऱ्यांच्या गोठ्यातून ४५ ते ५० रुपये प्रतिलिटर दराने दूध खरेदी करतात आणि तेच दूध ६० ते ७० रुपये प्रतिलिटरने बाजारात विकत आहेत.
काहीवेळा पाणी टाकून दुधाची विक्री होते, असाही आरोप या व्यवसायिकांनर होतो. एकूण दुधाच्या धंद्यात व्यावसायिकांचेच चांगभले होत आहे.