महिलेला ‘तू मला आवडतेस’ असा मेसेज करणं विनयभंगच; कोर्टाचा निर्णय, मुंबईकराला तुरुंगवास

0

[ad_1]

Court Case About Messages To Woman At Night: जर तुम्ही एखाद्या अनोळखी महिलेला ‘तू मला आवडतेस’, असा मेसेज केला, तर तुम्हाला न्यायालयामध्ये दोषी ठरवून थेट शिक्षा होऊ शकते. नुकतेच असेच एक प्रकरण आपल्या महाराष्ट्रातील दिंडोशीमध्ये समोर आलं आहे. एका प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने मेसेजच्या आधारे आरोप निश्चित करत मोठा निर्णय दिला आहे. अनोळखी महिलेला, ‘तू खूप सुंदर दिसतेस’ असा मेसेज पाठवणे म्हणजे विनयभंगच असल्याचं निरिक्षण दिंडोशी सत्र न्यायालयाने दिले आहे.

नेमकं प्रकरण काय?

न्यायालयातील युक्तीवादानुसार, तक्रारदार महिलेला एक पुरुष सतत व्हॉट्सअपवर मेसेज करायचा. रात्री 11 ते 12.30 वाजण्यादरम्यान तो विविध फोटो आणि मेसेज या महिलेला व्हॉट्सअपवर पाठवायचा. “तू सडपातळ आहेस, तू खूप हुशार आहेस, दिसायलाही गोरी आहेस. मी 40 वर्षांचा आहे, तुझे लग्न झालं आहे का?” असे मेसेज तो व्यक्ती या महिलेला सतत करायचा. “अनेकदा त्याने तू मला आवडतेस”, असेही मेसेज केल्याचं तक्रारदार महिलेचं म्हणणं आहे. सततच्या मेसेजेसला कंटाळून या महिलेने पोलिसात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंदवला होता.

शिक्षेला आव्हान

याप्रकरणीत न्यायालयाने 2022 रोजी आरोपीला दोषी ठरवले होते. त्याला तीन महिने तुरुगंवासाची शिक्षा सुनावली होती. यानंतर त्याने दिंडोशी सत्र न्यायालयात धाव घेतली. दिंडोशी सत्र न्यायालयात याप्रकरणाची सुनावणी करण्यात आली. यावेळी त्या आरोपीने कोर्टात बाजू मांडली. राजकीय वैमनस्यामुळे मला या प्रकरणात अडकवलं जात आहे, असे आरोपीने म्हटले. मात्र, न्यायालयाने आरोपीचा युक्तीवाद फेटाळून लावत ‘तुझ्याकडे असलेला एकही पुरावा सिद्ध होत नाही,’ असे सांगितले.

न्यायालयाने निकालात काय म्हटलं?

यावेळी दिंडोशी सत्र न्यायालयाने आपलं सविस्तर निरीक्षण या प्रकरणात नोंदवले. “कोणतीही महिला अशाप्रकारे आरोपीला खोट्या प्रकरणात अडकवून स्वत:ची प्रतिष्ठा पणाला लावणार नाही. अनोळखी महिलेला तू सडपातळ आहे, खूप हुशार आहेस, दिसायलाही गोरी आहेस, मला तू आवडतेस, असे मेसेज करणे म्हणजे विनयभंगच आहे. हे मेसेज महिलेच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवतात,” असं न्यायालयाने निकालात म्हटलं आहे. “कोणताही विवाहित पुरुष किंवा महिला अशा प्रकारचे व्हॉट्सअप मेसेज आणि अश्लील फोटो सहन करणार नाही. विशेषतः जेव्हा मेसेज पाठवणारा आणि तक्रारदार एकमेकांना ओळखतही नसतील. हे मेसेज आणि कृत्य महिलेच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवणारे आहे”, असा निकाल देत न्यायालयाने शिक्षा कायम ठेवली आहे.



[ad_2]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here