येथील सुप्रसिद्ध न्युरोफिजिशयन डॉक्टर शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरणात एक नवी घडामोड घडली आहे. वळसंगकर याच्या स्नुषा डॉक्टर शोनाली ह्या त्यांच्या वडिलांसह अचानक बेपत्ता झाल्यात. हे दोघे कुठे गेलेत हे अद्याप स्पष्ट झाले नाही. पण चौकशीचा ससेमिरा चुकवण्
.
डॉक्टर शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्येप्रकरणी त्यांच्या हॉस्पिटलच्या प्रशासकीय अधिकारी मनीषा माने हिच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी वळसंगकर कुटुंबीयांचे जबाब विशेषतः त्यांचे सुपुत्र डॉक्टर अश्विन व स्नुषा डॉक्टर शोनाली यांचीही चौकशी करण्यात आली आहे. पण या प्रकरणाचा उलगडा होण्यापूर्वीच डॉक्टर शोनाली बेपत्ता झाल्यामुळे या प्रकरणी वेगवेगळ्या चर्चा रंगल्या आहेत.
डॉक्टर शोनाली कुठे गेल्या? कुणालाच माहिती नाही
यासंबंधीच्या माहितीनुसार, डॉक्टर शोनाली व त्यांचे वडील डॉक्टर दिलीप जोशी यांनी 2 दिवसांपूर्वीच सोलापूर सोडल्याची चर्चा आहे. हे दोघेही भारत सोडून परदेशात गेल्याची चर्चा दबक्या आवाजात रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांत रंगली आहे. डॉक्टर जोशी यांचा मुलगा अमेरिकेत आहे. त्यामुळे ते दोघेही त्यांच्याकडे गेल्याचे सांगितले जात आहे. दुसरीकडे, डॉक्टर शोनाली लवकरच मुंबईत स्थायिक होणार असल्याचाही दावा केला जात आहे. तर काहींनी त्या 30 मेनंतर रुग्णालयातील आपली ओपीडी पाहणार असल्याचे सांगत आहेत. पण ही सर्व चर्चा सुरू असताना त्या नेमक्या कुठे गेल्यात? हे कुणालाही ठोसपणे सांगता येत नाही. त्यांचे पती डॉक्टर अश्विन यांची या प्रकरणी प्रतिक्रिया समजू शकली नाही. त्यामुळे याविषयी चर्चांना उधाण आले आहे.
निम्मे अधिकार देऊनही सून होती नाराज
उल्लेखनीय बाब म्हणजे डॉक्टर वळसंगकर यांनी आपली सून डॉक्टर शोनाली यांना रुग्णालयाचे निम्मे अधिकार दिले होते. त्यानंतरही त्यांना वळसंगकरांचा हस्तक्षेप मान्य नव्हता. गत काही दिवसांपासून सून व मुलामधील वाद वाढला होता. त्याचा रुग्णालयावर परिणाम होऊ नये, तोटा होऊ नये, रुग्णसंख्या रोडावू नये म्हणून मोठ्या डॉक्टरांची (वळसंगकर) रुग्णालयात ये-जा वाढली होती. पण त्यांचा हस्तक्षेप सून व मुलगा या दोघांनाही आवडत नव्हता. काही महिने वेगवेगळे राहिलेले डॉक्टर अश्विन व डॉक्टर शोनाली हे नुकतेच एकत्र आले होते, असेही या प्रकरणी सांगितले जात आहे.
सुसाईड नोटवरील स्वाक्षरी वळसंगकरांचीच आहे का?
डॉक्टर शिरीष वळसंगकर यांच्या खिशात सापडलेली सुसाईड नोट त्यांच्याच हस्ताक्षरातील आहे का? हे पडताळून पाहण्यासाठी पोलिसांनी रुग्णालयातून डॉक्टरांचे हस्ताक्षर व स्वाक्षरी असलेली काही दस्तऐवज जप्त केली आहेत. या दस्तऐवजावरील हस्ताक्षर व स्वाक्षरी सुसाईड नोटवरील हस्ताक्षर व स्वाक्षरीशी जुळवून पाहिली जाणार आहे. त्यासाठी हे दस्तऐवज तज्ज्ञांकडे पाठवण्यात आली आहेत. त्याचा रिपोर्ट लवकरच मिळण्याची शक्यता आहे.
पोलिसांकडे एप्रिलचे कॉल डिटेल्स
पोलिसांनी वळसंगकरांनी 1 ते 17 एप्रिल या काळात कुणाकुणाला फोन केले? त्यांना कुणाचे फोन आले? व त्यांनी सतत कुणाला फोन केले होते का? किंवा त्यांना कुणाचे सतत फोन आले होते? अनोळखी क्रमांकावरून कुणाचे फोन आले होते का? याची माहिती घेतली आहे. याशिवाय मनीषाने स्वतःच्या मोबाईलवरून डॉक्टरांना महिन्याभरात किती फोन केले? याचाही डेटा पोलिसांनी मिळवला आहे. डॉक्टरांचे घर व दवाखान्यातील 30 दिवसांचे सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांनी जप्त केले आहे. विशेषतः पोलिस या काळात वळसंगकरांना घरी कोण-कोण भेटण्यास आले त्याचा धुंडाळा घेत आहेत.