[ad_1]
रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) यांनी कसोटीमधून निवृत्ती घेतल्यानंतर त्यांच्या करारासंदर्भात बीसीसीआयने मोठा निर्णय घेतला आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी टी-20 आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी ग्रेड ए श्रेणीत कायम राहतील अशी माहिती बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी दिली आहे. याआधी एप्रिल महिन्यात बीसीसीआयने वार्षिक खेळाडू रिटेनरशिप 2024-25 जाहीर केली होती, ज्यामध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जाडेजा यांच्यासोबत ग्रेड ए श्रेणीत ठेवलं होतं.
“विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी टी-20 आणि कसोटीतून निवृत्ती घेतली असली तरी त्यांचा ग्रेड ए करार सुरूच राहील. ते अजूनही भारतीय क्रिकेट संघाचा भाग आहेत आणि त्यांना ग्रेड ए च्या सर्व सुविधा मिळतील,” असे देवजित सैकिया यांनी एएनआयला सांगितलं आहे.
इंग्लंडविरोधातील पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरु होण्याआधीच विराटने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. या मालिकेसह भारताची वर्ल्ड टेस्ट चॅम्पिअनशिप मोहीम सुरु होणार आहे. मात्र त्याआधीच विराटने आपलं 14 वर्षं मोठं करिअर थांबवण्याचा निर्णय घेतला.
विराट कोहलीने आपल्या कसोटी कारकिर्दीत 123 सामने खेळले, ज्यामध्ये 46.85 च्या सरासरीने 9230 धावा केल्या. त्याने 210 डावांमध्ये 30 शतकं आणि 31 अर्धशतकं केली. 254 वर नाबाद ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या राहिली. सचिन तेंडुलकर (15,921धावा), राहुल द्रविड (13,265 धावा) आणि सुनील गावस्कर (10,122 धावा) यांच्यानंतर या फॉरमॅटमध्ये भारताचा चौथा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे.
7 मे रोजी, रोहितने इंग्लंड दौऱ्यापूर्वी 67 कसोटी आणि 11 वर्षांच्या कारकिर्दीनंतर कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. त्याने 12 शतकं आणि 18 अर्धशतकांसह 40.57 च्या सरासरीने 4301 धावा केल्या. 2019 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या घरच्या मालिकेत त्याने 212 धावांची सर्वोच्च धावसंख्या रचली. रोहित भारताचा 16 वा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला.
2024 मध्ये, टी 20 विश्वचषक जिंकल्यानंतर विराट आणि रोहितने सर्वात लहान आंतरराष्ट्रीय फॉर्मेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. 35 टी-20 विश्वचषक सामन्यांमध्ये, विराटने 58.72 च्या सरासरीने आणि 128.81 च्या स्ट्राईक रेटने 1292 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये 15 अर्धशतकं आहेत. त्याची सर्वोत्तम धावसंख्या नाबाद 89 आहे.
125 टी-20 सामन्यांमध्ये, विराटने 48.69 च्या सरासरीने आणि 137.04 च्या स्ट्राईक रेटने 4188 धावा केल्या. त्याने एक शतक आणि 38 अर्धशतकं केली. नाबाद 122 ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या राहिली. तो आतापर्यंतचा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे.
दुसरीकडे, रोहितने 151 टी-20 सामन्यांमध्ये 140 पेक्षा जास्त स्ट्राईक रेटसह 32.05 च्या सरासरीने 4231 धावा केल्या आहेत. त्याने त्याच्या कारकिर्दीत पाच शतकं आणि 32 अर्धशतके केली. नाबाद 121 ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या आहे. रोहित या फॉरमॅटमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज देखील आहे.
[ad_2]