एकविराच्या वतीने महिला टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयेजन ;
महिला क्रिकेट सह बॅडमिंटन कुस्ती व रस्सीखेच स्पर्धा

0

संगमनेर  : काँग्रेसचेे वरिष्ठ नेते तथा राज्याचे माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील महिला व युवतींचे सबलीकरण आणि आरोग्याच्या प्रश्नांसाठी काम करणाऱ्या एकविरा फाउंडेशनच्या वतीने महिला दिनाच्या निमित्ताने ८ मार्च ते १० मार्च या काळात तालुक्यातील युवती व महिलांसाठी टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेसह कुस्ती, बॅडमिंटन व रस्सीखेच स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती एकविराच्या अध्यक्षा कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात यांनी दिली. 
           महिला दिनाच्या निमित्ताने आयोजित स्पर्धां बाबत माहिती देताना डॉ जयश्रीताई थोरात म्हणाल्या की, आठ मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून सर्वत्र साजरा होतो आहे. यानिमित्त संगमनेर तालुक्यात दरवर्षी महिलांसाठी विविध उपक्रम राबवले जातात. महिला या सर्व क्षेत्रात पुरुषांबरोबर काम करत आहेत हे सर्वांसाठी अभिमानास्पद आहे. यावर्षी महिला क्रिकेट मध्ये आयपीएल सुरू होत असून यामध्ये संगमनेर तालुक्यातील ही मुलींचा सहभाग आहे.जागतिक दिनानिमित्त ८ मार्च ते १० मार्च २०२३ या काळात सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुल येथे तालुक्यातील युवती व महिलांसाठी भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये तालुक्यातील युवतींचे विविध क्रिकेट संघ सहभागी होणार आहेत. तसेच राज्यभरातूनही काही मुलींचे संघ सहभागी होणार आहेत.या संघाना ड्रेस कोड देण्यात आले असून स्पर्धेसाठी मैदान, एलईडी व्यवस्था, कॉमेंट्री व्यवस्था ,बैठक व्यवस्था, खेळाडूंसाठी स्वतंत्र व्यवस्था यांसह स्पर्धेची अद्यावत तयारी करण्यात आली आहे. याचबरोबर शालेय व महाविद्यालय विद्यार्थिनी, तरुणी व महिलांसाठी बॅडमिंटन कुस्ती व रस्सीखेच स्पर्धेचे आयोजनही याच क्रीडा संकुलात करण्यात आले आहे.यासाठीही सर्व अत्याधुनिक सुविधा पुरविण्यात येणार आहेत.स्पर्धेच्या आयोजनासाठी एकविरा फाउंडेशनच्या वतीने आयोजित या स्पर्धेत जास्तीत जास्त महिला तरुणी व विद्यार्थिनींनी सहभाग घ्यावा असे आवाहन एकविरा फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here