* हजारो भक्तगण घेणार उपासक दीक्षा
पैठण,दिं.७ : स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज श्रीक्षेत्र नाणिजधाम प्रणित स्व-स्वरूप संप्रदाया तर्फे जगद्गुरूश्रींच्या पादुका दर्शन कार्यक्रमाचे आयोजन रविवार (दि.९) ऑक्टोबर रोजी सकाळी ९.वाजेपासुन संत एकनाथ सहकारी साखर कारखाना मैदान, पैठण रोड या ठिकाणी करण्यात आले असून या सोहळ्याच्या दिवशी हजारो भक्तगण सांप्रदायची उपासक दीक्षा घेणार असल्याची माहिती स्व-स्वरूप संप्रदाय भक्त सेवा मंडळ औरंगाबाद जिल्ह्याच्या वतीने देण्यात आली आहे. विज्ञानाने केली क्रांती परंतु अध्यात्माशिवाय नाही मन शांती यानुसार विज्ञान आजवर खूप मोठ्या प्रमाणात क्रांती करत असताना भौतिक सुखात माणूस हरवून जात असून या धावपळीच्या युगात माणूस यंत्रवत बनत चालला आहे. यामुळे मन शांती, अध्यात्मिक सुखाचा आभाव दिसून येतो. मनुष्यजीवन हताश, निराश झालेले आढळून येते. या साठी ‘स्व-स्वरूप संप्रदाय’ भक्त सेवा मंडळातर्फे अशा अध्यात्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. या सोहळ्याच्या माध्यमातून संस्थांन तर्फे विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात. यात गरजू होतकरू महिलांना घरघंटी वाटप, जनावरांसाठी चारावाटप, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांचे मोफत वाटप, रक्तदान, वैद्यकीय उपक्रम , राष्ट्रीय महामार्गावर अपघातग्रस्तांना मोफत अँबुलन्स सेवा, शेतकऱ्यांसाठी शेती साहित्य व अवजारे वाटप अशा अनेक उपक्रमांचा समावेश असतो. प्रवचनांमधून जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज आपल्या अमृतमय वाणीतून डोळे विज्ञानवादी मन अध्यात्मवादी आणि बुद्धी वास्तववादी ठेवा या त्रिसूत्रीचा वापर करून अशाप्रकारे जीवनात सुख, शांती, समाधान, स्थैर्य प्रगती साधता येते व आपल्यातील रजोगुण कमी करून सत्वगुण वाढविणे ज्यामुळे सकारात्मक दृष्टिकोन वाढतो यावर मार्गदर्शन होते.
दिवसभर चालणाऱ्या या प्रवचन व दर्शन सोहळा कार्यक्रमात सकाळी ९. वाजता महासंतसंग, पालखी सोहळा, श्रींच्या पादुकांचे आगमन, उपस्थित भक्तगण यांच्या हस्ते गुरुपूजन, प्रवचन, उपासक दीक्षा, पादुका दर्शन शेवटी पुष्पवृष्टीने सोहळ्याची सांगता होणार आहे. या कार्यक्रमास औरंगाबाद जिल्ह्यातील शिष्य, साधक, भक्तगण, हितचिंतक भाविक व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन ‘स्व-स्वरूप’ संप्रदाय भक्त सेवा मंडळ – औरंगाबाद जिल्हा यांच्या वतीने करण्यात आले आहे.