साताऱ्यातील चाहूल येथील प्रकार : सामाजिक कार्यकर्त्यांसह पोलिसांनीही केले बहुमोल सहकार्य
सातारा /प्रतिनिधी : सातारा शहरालगतच्या चाहूरमध्ये एका मृत पोलीस पत्नीच्या घरामध्ये घुसलेल्या घुसखोराला हटवण्यासाठी त्या महिलेने रणरागिनीचे रूप धारण केले आणि काही सामाजिक संघटना व पोलिसांनी केलेल्या बहुमोल सहकार्याने लवकरच न्यायालयाच्या आदेशानुसार संबंधित घुसखोरांना हटवण्यात यश मिळेल, याची खात्री झाल्याचेही संबंधित महिलेने माध्यमांशी बोलताना सांगितले.
याबाबत अधिक माहिती अशी की, एकंबे ता. कोरेगाव येथील श्रीमती वैशाली रवींद्र चव्हाण यांचे पती (कै.) रवींद्र रामदास चव्हाण यांनी स्वकमाईतून मौजे चाहूर (सातारा) येथे एक रो हाऊस विकत घेतला होता. सन 2016 मध्ये त्यांचे निधन झाले. दरम्यान, पतीच्या स्वकमाईची मिळकत असूनही श्रीमती चव्हाण यांचे सासरे रामदास बाजीराव चव्हाण यांनी अनाधिकाराने या मिळकतीबाबत निर्णय घेण्यास सुरुवात केली. श्रीमती चव्हाण व त्यांचे पती, मुलगा हे सर्व कुटुंब मुंबईत राहत असल्यामुळे या रो हाऊसमध्ये हणमंत सावंत यांनी सासरे रामदास चव्हाण यांच्या संगनमताने घुसखोरी केली. संबंधित घर खाली करून देण्याबाबत रीतसर सांगितले असता, हणमंत सावंत हे सासरे व नणंद यांच्या संगनमताने “घरातून बाहेर निघणार नाही. तुम्हाला वाटेल ते करा” अशी उद्धट विधाने करत असतात, अशी तक्रार ही वैशाली चव्हाण यांनी पोलिसांना दिलेल्या निवेदनात केली होती. पतीची स्वमालकीची मालमत्ता असूनही व त्यांच्या पश्चात मुलगा कौस्तुभ चव्हाण व पत्नी हे दोघे मयत रवींद्र चव्हाण यांचे कायदेशीर व नैसर्गिक वारसदार असूनही सन 2020 मध्ये सासू सौ. इंदुमती चव्हाण व सासरे रामदास चव्हाण यांनी खोटे व बोगस पुरावे सादर करून या मालमत्तेला त्यांची नावेही लावून घेतली. या फसवणूकप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात सासरे रामदास चव्हाण यांच्या विरोधात रीतसर तक्रारही दाखल केली आहे. त्यानुसार दिनांक 24 नोव्हेंबर 2021 रोजी भारतीय दंड विधान 420, 423, 426, 199, 200 व 34 या कलमान्वये फौजदारी स्वरूपाचा गुन्हाही दाखल करण्यात आला होता. दरम्यान, “संबंधित मालमत्तेतून घुसखोर हणमंत सावंत यांनी निघून जावे व घर खाली करून मूळ मालकास द्यावे” असे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. मात्र न्यायालयाचा आदेश व पोलिसांमध्ये दाखल तक्रारीच्या संदर्भाने कोणतेही सहकार्य श्री. सावंत यांच्याकडून करण्यात येत नाही. याउलट वैशाली चव्हाण यांचे सासरे व नणंदेचे पती सुरेश साळुंखे हे चुकीची माहिती देऊन घुसखोर सावंत यांना माझ्याविरुद्ध भडकवत आहेत. माझ्या नणंद सौ. सविता साळुंखे व त्यांचे पती सुरेश साळुंखे हे दोघे माझ्या सासऱ्यांना भरीस घालून विविध सरकारी कार्यालयांमध्ये नेत असतात व तक्रारी अर्ज देणे व अन्य गैरकृत्य करण्यास भाग पाडत असतात. वास्तविक सदरहू मालमत्ता नणंद व तिच्या पतीस मिळवून देण्यासाठी सासरे चुकीच्या पद्धतीने तक्रारी अर्ज करत असतात. मात्र संबंधित रो हाऊस पतीने स्वकमाईतून विकत घेतला असे असताना सासू- सासरे यांनी बेकायदेशीररित्या मालमत्तेवर त्यांची नावे लावून घेणे, भाडेकरूंना फूस लावणे, न्यायालयाच्या व पोलिसांच्या आदेशाचा मान न राखणे अशी गैरकृत्य केलेली आहेत, अशी तक्रारही श्रीमती चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलताना केली आहे व त्या आशयाचे निवेदनही पोलिसांना दिले आहे. या प्रकरणी ठोस न्याय मिळवून द्यावा व दोषींवर कारवाई व्हावी. यापूर्वी दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपींबाबत ठोस निर्णय व्हावा अशी माझी अपेक्षा आहे. अन्यथा उपोषणासारख्या कायदेशीर व सनदशीर मार्गावर मी ठाम आहे. त्यामुळे उद्भवणाऱ्या परिस्थितीत पोलीस व प्रशासन यंत्रणाच जबाबदार असेल, असेही श्रीमती वैशाली रवींद्र चव्हाण यांनी म्हटले आहे.
आज मंगळवारी सकाळी सामाजिक कार्यकर्ते प्रा. मारुती बोभाटे, वनिता जाधव व काही माध्यमप्रतिनिधींसमवेत श्रीमती चव्हाण आपल्या मालकीच्या घरासमोर गेल्या मात्र या घरातील घुसखोर श्री. सावंत यांनी घराच्या फाटकाला आतून कुलूप लावून घेतले होते. त्यांनी तुम्ही आत येऊ शकत नाही, अशी दुरुत्तरे घराच्या मालक असणाऱ्या श्रीमती वैशाली चव्हाण यांना केली तसेच उद्धटपणे वर्तन करीत घरात येण्यास प्रतिबंध केला. त्यावर स्वतः श्रीमती चव्हाण व सामाजिक कार्यकर्ते प्राध्यापक मारुती बोभाटे, वनिता जाधव यांनी संबंधित घुसखोर कुटुंबास वस्तुस्थिती व न्यायालयाचा निर्णय वाचून दाखवला. मात्र तरीही सावंत यांनी अडेलतट्टूपणाचीच भूमिका घेतली. त्यानंतर श्रीमती चव्हाण यांनी शहर पोलीस ठाण्यात येऊन याबाबत रीतसर तक्रार दाखल केली. दरम्यान, आपल्या निवेदनाच्या प्रती श्रीमती चव्हाण यांनी मुख्यमंत्री, पालकमंत्री, जिल्हाधिकारी आदींनाही सादर केल्या आहेत.